जय श्री राम”च्या घोषणांनी दुमदुमले पंकज विद्यालय
चोपडा,दि.२६(प्रतिनिधी) – श्री राम जन्मोत्सव निमित्ताने पंकज प्राथमिक विद्यालयात भक्ती, संस्कार आणि उत्साह यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. संपूर्ण विद्यालय परिसर “जय श्री राम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि वातावरण राममय झाले.कार्यक्रमाची सुरुवात भव्य शोभायात्रेने झाली. विद्यार्थ्यांनी वनवासी व पारंपारिक वेशभूषेत सहभागी होत प्रभू श्रीरामांच्या जीवनातील प्रसंग जिवंत केले. मोक्ष जैस्वाल (राम), भाग्येश वाघ (लक्ष्मण), लावण्या पाटील (सीता) आणि लक्ष मराठे (हनुमान) यांच्या भूमिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन संचालक नारायण बोरोले व उपशिक्षक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि पूजनाने कार्यक्रमाला भक्तिमय सुरुवात झाली.
डी. एम. जैस्वाल यांनी साकारलेले श्री राम गुण दर्शक फलक विशेष आकर्षण ठरले. या फलकांमधून प्रभू श्रीरामांचे आदर्श, सत्यनिष्ठा, धर्मपालन आणि कर्तव्यपरायणता यांचे प्रभावी दर्शन घडले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कारांची सुंदर छाप उमटली.
श्रीमती जयश्री पाटील यांनी सादर केलेल्या रामरक्षा स्तोत्र पठणाने वातावरण अधिक भक्तिमय झाले, तर तेजस सोनवणे यांनी प्रभू श्रीरामांच्या जीवनाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत नृत्य आणि भजनाने कार्यक्रमात रंगत भरली. लहानग्यांनी साकारलेल्या श्रीरामाच्या पारंपारिक वेशभूषेने सर्वांच्या मनात भक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण केली.
संपूर्ण कार्यक्रमात आनंद, भक्ती आणि सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडले. विद्यालयातील अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना श्रीरामांच्या आदर्शांचे पालन करण्याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी प्रभावीपणे केले. तसेच कैलास बोरसे, किशोर पाटील, रविंद्र शार्दुल, दिलीप बाविस्कर आणि प्रमोद पाटील यांचे सहकार्य लाभले.अशा या उत्साहपूर्ण आणि संस्कारमय कार्यक्रमामुळे पंकज विद्यालयात खऱ्या अर्थाने रामराज्याचा आनंद अनुभवायला मिळाला.
