मुक्या "वानराचा" दशविधी उत्तर कार्याचा बेत..भार्डूकरांच्या अनोखे कार्याची परिसरात रंगली चर्चा
चोपडा,दि.५(प्रतिनिधी) : तालुक्यातील भारडू गावात चक्क वानराच्या दशविधि क्रिया कार्यक्रम होणार असून उत्तर कार्य करण्याचा बेतही नागरिकांनी आखला आहे. खरोखर या प्रकाराने प्राणी प्रेम उफाळून आले आहे. एरवी मानवालाच माणूस म्हणून न पाहण्याचा घृणास्पद प्रकार वाढीस लागला असून माणसांमध्ये माणुसकीचा अंत पाहायला मिळत आहे. मात्र या गावात चक्क मुक्या प्राण्याचाही अंत्यविधी करून दशविधी व उत्तर कार्यकर्त्यांचे महान कार्य हाती घेतल्याने संपूर्ण परिसरात या गावाचा उदो उदो होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भारडू गावात माणुसकीचं हृदयस्पर्शी दुर्मीळ दर्शन पाहावयास मिळाले की तीन वर्षांपासून गावात वास्तव्यास असलेल्या एका माकडाचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मानाने अखेरचा निरोप दिला. सदर माकड गेली तीन वर्षे गावात मुक्तपणे वावरत होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी त्याची एक आपुलकी निर्माण झाली होती. गावातील दैनंदिन जीवनाचा तो जणू अविभाज्य घटक बनला होता. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी समजताच गावकऱ्यांनी एकत्र येत त्या माकडाची विधीवत अंत्ययात्रा काढून पारंपरिक पद्धतीने दफन विधी केला आला. आता त्याचा विधिवत दशक्रिया व उत्तर कार्य करण्याचा बेत ठरविला असल्याने परिसरात गावकऱ्यांचे महान कार्याचा गवगवा होतं आहे.
