महिला मंडळ शाळेचा पियुष बारी बोर्डात इंग्रजी विषयात प्रथम
चोपडा,दि.१७(प्रतिनिधी)- येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पियुष सचिन बारी याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे तर्फे फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात बोर्डात सर्वप्रथम (९७ गुण) येत स्व. रामचंद्र यशवंत दळवी स्मृती पारितोषिक प्राप्त केले. त्याच्या या उल्लेखनीय गौरवास्पद यशाबद्दल संस्थेतर्फे पियुष बारी याचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले, उद्योजक आशिष गुजराथी यांच्यासह संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच पियुष बारी याचे पालक उपस्थित होते.
भगिनी मंडळ संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पियुषचा भेटवस्तू व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पियुषचे आजोबा सेवानिवृत्त शिक्षक मधुकर बारी यांचाही सत्कार करण्यात आला. तर पियुषला मार्गदर्शन करणाऱ्या इंग्रजी भाषा शिक्षक एस. आर. बारी व पी. एस. चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी गुणवंतांचे कौतुक करताना प्रा. अरुणभाई गुजराथी म्हणाले, ध्येय स्पष्ट असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळते. एखादा सामान्य घरातील जेव्हा उत्तुंग यश मिळवतो तेव्हा त्याचा आनंद फक्त त्याच्यासाठी मर्यादित राहत नाही तर तो सगळ्यांच्या अभिमानाचा विषय बनतो. पियुषचे यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे. याप्रसंगी पियुष बारी यांनीदेखील भावना व्यक्त करतांना शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर चंद्रहास गुजराथी, आशिष गुजराथी, पवन देसले यांनी मनोगतातून प्रेरणा देत मार्गदर्शन केले.
या गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी व आभार प्रदर्शन अनिल महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत चौधरी, संजय सोनवणे, भावेश लोहार, प्रशांत चव्हाण, वनराज महाले, विजय पाटील, सागर चौधरी, कविता पाटील, यशोदा ठोके यांच्यासह बाळासाहेब भालेराव, राधेश्याम पाटील, मधुकर साळवे यांनी परिश्रम घेतले.
