'रासेयो शिबिरात संकलित दीड क्विंटल धान्याचे ३ गरजू परिवारांना वाटप'
🔲'भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयाचा उपक्रम'
चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी) -भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने
रासेयोचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव निमगव्हाण (ता.चोपडा) येथे नुकतेच संपन्न झाले,
या शिबिरात विद्यापीठाच्या आदेशान्वये विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्वाची भावना रुजावी या उद्देशाने 'एक मूठ धान्य संकलन' अभियान राबविण्यात आले, यात गावातील प्रत्येक घरी जाऊन रासेयो स्वयंसेवकांनी एक - एक मूठ धान्य गोळा केले, यातून तब्बल दीड क्विंटल गहू, तांदूळ, ज्वारी आदी स्वरूपातील धान्य संकलित करण्यात आले.
सदरील धान्याचे वाटप आज दि.२४ फेब्रुवारी रोजी चोपडा शहरातील ३ आदिवासी व मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू परिवारांना वाटप करण्यात आले,
या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू परिवारांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य रासेयो स्वयंसेवकांनी केले.
धान्य प्राप्त झाल्याबद्दल कुटुंबांनी रासेयो विभाग व भगिनी मंडळ संस्थेचे आभार मानले,
युवा उद्योजक श्री.आशिषभाई गुजराथी, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सौ.पूनमताई गुजराथी, सहसचिव अश्विनीताई गुजराथी, प्रभारी प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, डॉ.आशिष गुजराथी, रासेयो विभागीय समन्वयक डॉ.दिलीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनातून विभाग प्रमुख डॉ.संजय चौधरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.अनिल बाविस्कर, महिला कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.मोहिनी पाटील, सहा.प्रा.गोपाल बडगुजर, विद्यार्थी विकास अधिकारी सहा.प्रा.सुनिल पाचवणे, सहा.प्रा.प्रमोद वाघ, सहा.प्रा.भाग्यश्री महाजन आदींच्या उपस्थितीत धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
