अमळनेर-चोपडा रेल्वे मार्ग सर्वेक्षणाचे भिजत घोंगडे? केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व खा.स्मिताताई वाघ लक्ष घालणार काय?

 अमळनेर-चोपडा रेल्वे मार्ग सर्वेक्षणाचे भिजत घोंगडे? केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व खा.स्मिताताई वाघ लक्ष घालणार काय?

​चोपडा  दि.५ ( डॉ.अनिलकुमार पालीवाल) :केंद्र सरकारच्या 'पीएम गती शक्ती' (PM Gati Shakti) अभियानांतर्गत खान्देशातील महत्त्वाच्या अशा अमळनेर-चोपडा रेल्वे मार्गाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ५० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे रेल्वेने जोडण्याच्या धोरणामुळे चोपडा शहराचा रेल्वे नकाशावर येण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी या मार्गाच्या 'प्रत्यक्ष सर्वेक्षणाला वेग कधी येणार?' असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.तरी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व खासदार स्मिता ताई वाघ यांनी लक्ष घालणार काय?असा सवाल दोन्ही तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.

सर्वेक्षणाची सद्यस्थिती काय?

​रेल्वेच्या प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर ते चोपडा या साधारण ३५ ते ४० किलोमीटरच्या मार्गासाठी यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पातोंडा, चहार्डी आणि चोपडा परिसरात प्राथमिक चाचपणी (Feasibility Study) केली .होती. मात्र, या प्रकल्पाला अंतिम तांत्रिक मंजुरी मिळून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार होणे अद्याप बाकी आहे. रेल्वेच्या २०२५-२६ च्या नियोजन आराखड्यात या मार्गासाठी भरीव तरतूद झाल्यास सर्वेक्षणाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

प्रकल्प रखडण्याची कारणे आणि आव्हाने:

• ​भूसंपादन प्रक्रिया: अमळनेर आणि चोपडा या दोन्ही सुपीक तालुक्यांतून हा मार्ग जाणार असल्याने जमिनीचे अधिग्रहण करणे हे आव्हान असणार आहे.

*निधीची उपलब्धता:* 'पीएम गती शक्ती' अंतर्गत अनेक मोठे प्रकल्प (उदा. जळगाव-जालना, मनमाड-इंदूर) पाइपलाइनमध्ये आहेत, त्यामुळे या छोट्या पण महत्त्वाच्या मार्गाला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे.

राजकीय पाठपुरावा

या मार्गासाठी स्थानिक खासदारांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यास सर्वेक्षणाच्या निविदा लवकर निघू शकतात.


​मार्गाचे महत्त्व: का आहे हा मार्ग गरजेचा?

​१. व्यापारी उलाढाल: चोपडा हा शेतीमालाचा मोठा केंद्र आहे. रेल्वे आल्यास केळी, कापूस आणि अन्नधान्याची वाहतूक स्वस्त होऊन व्यापाराला चालना मिळेल.

२. औद्योगिक विकास: चहार्डी साखर कारखाना आणि परिसरातील सूतगिरण्यांना कच्चा माल आणि उत्पादित माल वाहून नेण्यासाठी रेल्वे मार्ग वरदान ठरेल.

३. कनेक्टिव्हिटी: चोपडा शहर रेल्वेने जोडले गेल्यावर भविष्यात हा मार्ग शिरपूर किंवा मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या शहरांना जोडला जाऊ शकतो.

4 *​पुढील पाऊल काय?*

​रेल्वे प्रशासनाने या वर्षात सर्वेक्षणासाठी निधी मंजूर केला, तर प्रत्यक्ष मैदानी मोजणी (Ground Survey) आणि माती परीक्षण यांसारख्या कामांना सुरुवात होऊ शकते. खान्देशातील जनता आता रेल्वेच्या या 'गती' कडे डोळे लावून बसली आहे.

   खरे पाहता जळगाव जिल्ह्यात एकमेव चोपडा तालुक्यातील एकही गावाला रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही.इतर चौदा तालुक्यात कोणत्या ना कोणत्या गावात रेल्वे मार्ग व स्टेशन्स आहेत.वास्तविक चोपडा तालुक्यातील रेल्वे मार्ग मागणी ही एक्काहतर वर्षापूर्वीची आहे.पण राजकीय नेत्यांना याबद्दल थोडीही माहिती नाही व त्यांची अनभिज्ञता ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

      1955 पासून मनमाड...इंदौर रेल्वे मार्गाची मागणी तत्कालीन उपमंत्री स्व.मधुकरराव चौधरी व जनसंघाचे नेते स्व.नानासाहेब उत्तमरावजी पाटील यांनी महाराष्ट्र विधिमंडळात उचलली व त्यावेळी राज्य आर्थिक सर्वेक्षणात औद्योगिक प्रगतीसाठी प्र.चि.शेजवलकर समितीने मनमाड...इंदौर रेल्वे मार्ग निर्माण प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवत हा रेल्वे मार्ग उभारणीच्या काम गती देण्यात यावी म्हणून मनमाड, मालेगाव, धुळे,अमळनेर,चोपडा,मार्गे सातपुडा पर्वत मार्गे मध्यप्रदेशातून आदिवासी बहुल क्षेत्रातील धावलीद,गोगाव,विस्टान मार्गे खरगौन पर्यंत नेण्यात यावा व तेथून प्रस्तावित खंडवा...दाहोद रेल्वे मार्गाला जोडत इंदौर व तेथून दाहोद पर्यंत रेल्वे मार्ग बनविण्याच्या प्रस्तावास तत्कालीन नियोजन आयोगाने खर्चाला मान्यता दिलेली होती. महाराष्ट्र विधानसभा मार्फत एका ठरावाद्वारे केंद्र सरकारचे लक्ष्य देखील वेधण्यात आले होते.धुळ्याचे माजी आमदार स्व. ग.द.माळी,स्व.सदाशिवराव माळी,स्व.प्रल्हाद्तात्या पाटील,स्व.माधवराव गोटू पाटील,स्व.माधवराव चौधरी, श्री अनिल अण्णा गोटे,स्व.देशराजजी अग्रवाल, ज्येष्ठ पत्रकार स्व.द्वारकादास पालीवाल,माजी खासदार स्व.रामभाऊ म्हाळगी, स्व.श्रीकिसन अग्रवाल,आदींनी ह्या रेल्वेच्या मागणीला तत्कालीन रेल्वे मंत्री स्व.मधु दंडवते यांच्याकडे लावून धरली.याबाबत धुळ्याचे खानदेश विकास परिषदेने त्यावेळी रेल्वे मागणी परिषदेचे आयोजन देखील केले होते.परंतु स्थानिक स्तरावर सत्ताधारी नेते कमजोर पडले.त्यांना चोपडा तालुक्यातील विकासाचे व्हिजन नसल्याचेच यातून दिसून येते.एव्हढेच नव्हे तर विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी देखील चोपडा त्यांच्या रावेर लोकसभा क्षेत्रात सतत तिन्ही टर्म लाखोच्या मताधिक्य देऊनही चोपडा तालुक्यातील विकासाचे पाया रोवणाऱ्या ह्या रेल्वेच्या मार्गावर साधा ब्र शब्द देखील लोकसभेत किंवा सरकारकडे उच्चारला  नाही.... ही तालुका वासियांची खंत आहे.आजचे विरोधी पक्ष साठ वर्ष सत्तेत असताना निष्क्रिय ठरल्याने व तेव्हाचे रेल्वे मागणी करणारे आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असताना देखील गप्प असल्याचे दिसत आहे.चोपड्यात रेल्वे मार्ग यावा,ही खानदेशातील तत्कालीन विकास पुरुष,उद्योगपती दानशूर श्रीमंत प्रतापशेठ यांची तळमळ होती...पण अमळनेर चोपडा दरम्यान असलेल्या तापी नदीच्या पूल उभारणीचा खर्च सरकारला द्यायला तयार असतांनाही सरकारने प्रताप पूल नाव देण्यास मान्यता न दिल्याने हा रेल्वे मार्ग रखडला तो कायमचा...असे जुने जाणते आज ही बोलतांना दिसतात... 

      या रेल्वे मार्गाच्या कामाला गती आणण्यासाठी अनेकांनी भगीरथ प्रयत्न केले,पण खरी गती आली मोदी सरकारच्याच काळात.. पण त्यातही चोपड्याकडे दुर्लक्ष झाले.पण उशिरा का होईना अमळनेर..चोपडा या रेल्वे मार्ग सर्वेक्षणाचे काम सुरू झाले होते...पण त्यातही खोळंबा आला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.यावेळच्या अर्थसंकल्पात देखील कोणतेही नियोजन दिसत नसल्याने चोपडा तालुक्यातील जनतेने तीव्र निषेध करत नाराजी व्यक्त केली असून केंद्र सरकारने अमळनेर चोपडा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यासोबत हा रेल्वे मार्ग पुढे चोपडा ते शिरपूरपर्यंत थेट मनमाड इंदौर रेल्वे मार्गाला शिरपूरहून जोडावा,अशी मागणी जोर धरत आहे.कारण जळगाव जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत चोपडा तालुक्यातील जनतेला जास्त आवश्यकता आहे...यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सर्व पक्षीय मतभेद विसरून विकासाच्या मुद्द्यावर रेल्वे मार्ग उभारणीच्या मागणीस पूर्णत्वास न्यावे,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने