खेडिभोकरी-भोकर दरम्यान फफुट्यामुळे अपघातांचा धोका ..!
♦️रस्त्यावर रेती, मुरूम, पाणी टाका.. गोरगावलेचे माजी सरपंचांची मागणी
चोपडा दि.४(प्रतिनिधी) :-तालुक्यातील खेडिभोकरी ते भोकर दरम्यान तापी नदीच्या खोऱ्यात नविन बनविण्यात आलेला कच्चा रस्ता फफुट्यामुळे अपघातांना आमंत्रण देणारा झाला आहे. तापी नदीच्या काठावर हा रस्ता बनविण्यात आला असून रस्त्यावर गाळमिश्रीत मातीमुळे मोठ्या प्रमाणात फफुटा झाला आहे. लहान मोठ्या वाहनांच्या वापरामुळे येथे फफुट्याचे लोट उठतात त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाहीत. त्यामुळे दिवसागणिक लहान मोठे अपघात होत आहेत. कालच जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे यावलकर हे ह्या रस्त्याने जातांना त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या वाहनाने ठोस दिल्याने त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ह्या रस्त्यांवरून दिवसरात्र हज्जारों लहान मोठे वाहने वापरतात. वाहनचालक व पादचारी यांना मरणयातना सहन कराव्या लागतात. संबंधित विभागाने ह्या कच्च्या रस्त्यावर पाणी रेती मुरूम टाकून रस्ता त्वरित पक्का करावा, अशी मागणी चोपडा मार्केट कमिटिचे माजी संचालक व गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आहे.
