चोपड्यात प्रथमच १८ फूट उंच कच्च्या केळ्यांपासून साकारले भव्य महाशिवलिंग महाशिवरात्रीनिमित्त अनोखा आध्यात्मिक उपक्रम
चोपडा दि.१३( प्रतिनिधी):महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो. सृष्टीचे रचयिता, सर्व आत्म्यांचे परमपिता, निराकार परमात्मा शिव यांच्या अवतरणाचा हा स्मरणदिन असल्याची आध्यात्मिक मान्यता आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे आणि अशांततेतून शांततेकडे नेणारा हा पर्व मानवी जीवनात आत्मचिंतन, संयम, पवित्रता आणि सद्भावना जागृत करणारा आहे. उपवास, जप, तप, ध्यान आणि रुद्राभिषेक यांसारख्या धार्मिक कृतींबरोबरच आत्मशुद्धी व सद्गुणांचा स्वीकार करण्याचा संदेशही या दिवशी दिला जातो.
याच महत्त्वपूर्ण पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, चोपडा यांच्या वतीने एक आगळावेगळा आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रथमच १८ फूट उंच व २१,१११ ( एकवीस हजार एकशे अकरा ) कच्च्या केळ्यांपासून साकारलेले भव्य महाशिवलिंग दर्शनासाठी सजविण्यात आले असून, हा उपक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पर्यावरणपूरक आणि सर्जनशील पद्धतीने साकारलेले हे महाशिवलिंग भक्तांच्या श्रद्धेला नवचैतन्य देणारे ठरत आहे.
या निमित्ताने प्रभू चिंतन भवन, ओम शांतीनगर, यावल रोड, चोपडा येथे १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी ७.३० वाजता व रात्री ७ वाजता आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले असून, त्यातून शिवतत्त्वाचे गूढ, आत्मा-परमात्म्याचे नाते, तसेच सदाचारयुक्त जीवनाची दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे.
आयोजकांनी नागरिकांना सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व परमात्म्याचा दिव्य संदेश समजून घ्यावा, असे आवाहन केले आहे.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चोपडा शहरात साकारलेला हा अनोखा उपक्रम भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे.
