यावलमध्ये आदिवासी पालकांचे उपोषणाला तात्पुरती स्थगिती!तहसीलदार नाझिरकर व प्रकल्प अधिकारी पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा
चोपडा दि.१०(प्रतिनिधी) :यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अखेर तोडग्याची पहाट दिसली आहे. आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर आज महत्त्वाची बैठक पार पडली असून तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी थेट आंदोलन स्थळी उपस्थित राहून मध्यस्थी केली. यावर झटपट पोलखोलने वृत्त प्रसारित केले होते यावर अधिकाऱ्यांनी दखल घेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
आंदोलकांनी गेल्या तीन दिवसांपासून प्रकल्प कार्यालयासमोर न्यायाच्या मागण्यांसाठी ठिय्या देत संघर्ष सुरू ठेवला होता. प्रशासनाने कुठलीही ठोस दखल न घेतल्याचा आरोप करीत आंदोलन तीव्र होत असतानाच आज झालेल्या चर्चेनंतर उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.तहसीलदार नाझिरकर यांनी आंदोलकांच्या मागण्या शासनापर्यंत त्वरीत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. प्रकल्प अधिकारी पवार यांनीही आवश्यक प्रस्ताव व कागदपत्रे पुढे पाठवण्याबाबत सकारात्मक भूमिका स्पष्ट केली.यावेळी
आंदोलकांनी “शासनाने लेखी हमी देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली तरच उपोषणाची मागे घेतले जाईल नाहितर पुन्हा उपोषण केले जाईल ” अशा शब्दांत इशारा दिला आहे. तात्पुरती स्थगिती जरी देण्यात आली असली तरी संघर्षाची ज्योत कायम असल्याचे संकेत त्यांनी दिले.यावलमध्ये तीन दिवसांपासून पेटलेल्या असंतोषाच्या आंदोलनाला आता तात्पुरती विश्रांती मिळाली असली तरी आगामी दिवसांमध्ये प्रशासनाने घेतलेली पावले निर्णायक ठरणार आहेत.
