अखेर बहु प्रतिक्षित निवडणूक घोषित.. राज्यातील नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूकीचे मतदान २ डिंसेबरला .. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले बापू ,दादा लवकरच रिंगणात.. निवडणूक तारखा,खर्चाची वाढ सविस्तर माहिती वाचकांसाठी
मुंबई दि.४ :-राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. १० डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.कोणत्या नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार याची सविस्तर जिल्हानिहाय यादीदेखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम ?
♦️अर्ज दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबर २०२५
♦️अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५
♦️अर्जाची छाननी - १८ नोव्हेंबर २०२५
♦️अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५
♦️आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत - २५ नोव्हेंबर २०२५*
♦️निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी - २६ नोव्हेंबर २०२५
♦️मतदान - २ डिसेंबर २०२५
♦️मतमोजणी - ३ डिसेंबर २०२५
♦️ निकाल शासकीय राजपत्रात जाहीर करण्याचा दिवस- १० डिसेंबर २०२५
नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक आकडेवारी...
राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामधून ६,८४९ सदस्यांची व २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. यंदा १० नव्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तर, २३६ नगर परिषदांची मुदत संपली आहे. तसेच राज्यातील ४७ पैकी पाच नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. तर उर्वरित ४२ नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे. यापैकी २७नगर पंतायतींची मुदत संपली असून १५ नव्या नगरपंचायतींची यंदा भर पडली आहे.
उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा वाढवली !
या निवडणुकीत अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख व सदस्यपदासाठी ५ लाखांची खर्चमर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे ११ लाख २५ हजार आणि ३ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. क वर्गासाठी हीच मर्यादा अनुक्रमे ७ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. याशिवाय, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
एकूण जागा आणि आरक्षित जागा
🌼निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा- २४६
🌼निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती- ४२
🌼एकूण प्रभाग- ३८२०
🌼एकूण जागा- ६८५९
🌼महिलांसाठी जागा- ३४९२
🌼अनुसूचित जातींसाठी जागा- ८९५
🌼अनुसूचित जमातींसाठी जागा- ३३८
🌼नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- १८२१
मतदारांच्या मदतीसाठी निवडणूक आयोगाचे मोबाईल अॅप
दरम्यान, मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील सर्च सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधता येईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. मात्र, त्याचबरोबर मोबाईल अपदेखील विकसित केल्याचं ते म्हणाले. त्याद्वारे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, उमेदवाराविषयी माहिती, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती, शिक्षणाविषयी, आर्थिक स्थितीविषयी मतदारांना माहिती मिळू शकेल.(साभार लोकसत्ता वृत्त संस्था)
