खानदेशात रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात
विरदेल (ता सिंदखेडा) जितेंद्र पेंढारकर यांच्या शेतात बीबीएफ पद्धतीने सुरू असलेली दादरची पेरणी
गणपूर (ता चोपडा) ता 12: खानदेशातील विविध तालुक्यात कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाच्या हरभरा आणि दादर पिकाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. फक्त हिवाळी हंगामातील वातावरणावर येणाऱ्या दादर आणि हरभरा पिकाचे उत्पादन हे खानदेशातील मातीचे वैशिष्ट्य होय. गेली अनेक दशके खानदेशात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्रात जमिनीत ओल असेपर्यंत हरभरा आणि दादरची पेरणी केली जाते.फक्त थंडीच्या जोरावर येणाऱ्या या पिकातून खानदेशातील शेतकऱ्यांनी दरवर्षी चांगल्या प्रकारचे उत्पादन घेतले आहे. आता या पेरणीत काळानुरूप बलत होत असून आता बीबीएफ पद्धतीचा वापर करत ट्रॅक्टरचलित यंत्राने पेरणी होऊ लागली आहे. तर अजूनही बऱ्याच भागात दुसे, तिफन व नाईच्या साह्याने दादर आणि हरभऱ्याची कोरडवाहू क्षेत्रात पेरणी केली जाते. गेल्या काही दशकात बागायती क्षेत्राचे प्रमाण वाढल्यामुळे दादर आणि हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र काही प्रमाणात घटल्याचे जितेंद्र पेंढारकर यांनी बोलतांना सांगितले.