घर बने मंदिर : कौटुंबिक सुसंवादासाठी ब्रह्माकुमारीज चोपडा केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम
चोपडा,दि.७ (प्रतिनिधी ): “जिथे प्रेम आहे.... तेच खरे घर, जिथे आपलेपणा आहे ...तिथेच आनंद,जिथे परस्पर सुसंवाद, सहकार्य आणि संवाद आहे तिथेच घर मंदिरासारखे बनते.” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित ‘घर बने मंदिर’ हा विशेष कार्यक्रम ब्रह्माकुमारी युथ विंग, चोपडा यांच्या वतीने मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ४ ते ६ वाजता प्रभू चिंतन भवन, ओम शांती केंद्र, चोपडा येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट घरामध्ये प्रेम, आदर, परस्पर सुसंवाद व पवित्र वातावरण निर्माण करून कौटुंबिक जीवनाला आनंदी व सुसंवादी बनवणे हे होते. महिलांना आपल्या घरातील सासू, सून, वहिनींसह एकत्रितपणे या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मुख्य वक्त्या म्हणून ब्रह्माकुमारी गीता बहन (भीमनाल, राजस्थान) यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की ,“घर फक्त भिंतींच्या चौकटीतले नसते, तर प्रेम, आपुलकी आणि शुद्ध संस्कारांनी सजलेले ते स्थानच खरे मंदिर ठरते. प्रत्येकाने आधी स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले तर कौटुंबिक जीवन सुखी, सुसंवादी आणि देवत्वमय होऊ शकते.” कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा राजेंद्र पाटील , प्रभाबेन गुजराथी व प्रा. माया शिंदे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगला दीदी यांनी केले. तर सूत्रसंचालन करिष्मा दीदी यांनी आकर्षक शब्दांत केले तर आभार प्रदर्शन शितल दीदी यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चोपडा ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दीदी, सारिका दीदी, करिष्मा दीदी व शीतल दीदी , जयश्री बेन, कांचन बेन यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित महिलांनी प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले व त्यांनी ठरवले की “आता आपले घरही मंदिरासारखे सुसंवादी व पवित्र वातावरणाचे होईल.”
प्रवेश विनामूल्य, लाभ अमूल्य – या तत्त्वावर आधारित हा उपक्रम उपस्थितांना आयुष्यभरासाठी प्रेरणा देणारा ठरला. हा कार्यक्रम केवळ उपदेशापुरता मर्यादित न राहता, कौटुंबिक एकता, सुसंवाद आणि आनंदी जीवनासाठी एक नवा दृष्टिकोन देणारा पर्वणीसमान सोहळा ठरला....