भगिनी मंडळातर्फे सुशील शिक्षक पुरस्कार व सुशील महिला उद्योजकता पुरस्कारांचे वितरण

 भगिनी मंडळातर्फे सुशील शिक्षक पुरस्कार व सुशील महिला उद्योजकता पुरस्कारांचे वितरण 


चोपडा,दि.२७(प्रतिनिधी) - येथील भगिनी मंडळ संस्थेच्या माजी अध्यक्ष स्व. सुशीलाबेन शाह यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुशील शिक्षक पुरस्कार व सुशील महिला उद्योजकता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

   भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे होते. दरवर्षी संस्थेतील एका गुणवंत शिक्षकाला दिला जाणारा 'सुशील शिक्षक पुरस्कार' यंदा महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक तथा पर्यवेक्षक विजय दिवाणराव पाटील यांना माजी आमदार चंद्रकांत गोसालिया (कांदिवली) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर महिलांच्या उद्यमशीलतेला प्रेरणा देणारा 'सुशील महिला उद्योजकता पुरस्कार' जळगाव येथील जी.एच.रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते वैद्य सौ. प्राजक्ता महाले (आयुर्वेदिक उत्पादने), श्रीमती निलोफरबी शेख अस्लम (शिवणकाम), सौ. रंजना नारळे (खाद्य पदार्थ उत्पादक) यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर डॉ. विकास हरताळकर, चंद्रहास गुजराथी तसेच संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी हे उपस्थित होते. तसेच यावेळी मंचावरील मान्यवरांच्या हस्ते भगिनी मंडळ संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या 'सुशील वार्ता' या पाक्षिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी 'सशक्त महिला उद्योजक आत्मनिर्भर भारताच्या दिशेने' या विषयावर मार्गदर्शन करताना सौ. प्रीती अग्रवाल म्हणाल्या, आत्मनिर्भर भारताची खरी शक्ती ग्रामीण भागात असून ती महिलांमध्ये आहे. आज देशात अडीच लाख महिला उद्योजकांनी स्टार्टअपच्या माध्यमातून मोठी भरारी घेतली आहे. यासाठी व्यवसायाचे ज्ञान, योग्य कौशल्य आणि पुरक दृष्टिकोन आवश्यक आहे. उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी आवश्यक असणारा प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा व संयम महिलांजवळ असतो कारण महिला या बहुमुखी आणि बहुआयामी असतात. यावेळी त्यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.

       पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी माजी आमदार चंद्रकांत गोसालिया यांनी भगिनी मंडळ संस्थेच्या विकासात्मक वाटचालीचे कौतुक करत पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय बारी यांनी, प्रास्ताविक पूनम गुजराथी यांनी तर प्रमुख अतिथींचा परिचय वनराज महाले व अनिल बाविस्कर यांनी करून दिला. याप्रसंगी संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयातील संशोधन केंद्रात संशोधनकार्य (पीएच.डी.) करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिव्यामुक्त समाजासाठी शपथ घेण्यात आली. प्रा . डॉ. विनोद रायपूरे यांनी सर्वांना शपथ दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यास तालुक्यातील अनेक मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने