सनराइज् किड्स स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
चोपडा दि.२(प्रतिनिधी)गगनभेद बहुउद्देशीय संस्था संचालित सनराइज् किड्स स्कूल, अडावद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजी व लालबहाद्दूर शास्त्रीजींच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका पुनम बोरसे यांनी प्रास्ताविक करून गांधीजींचे सत्य, अहिंसा आणि शास्त्रीजींचे “जय जवान, जय किसान” हे विचार विद्यार्थ्यांना सांगितले.
यानंतर काही विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींबद्दल भाषण दिले. यात ज्युनिअर केजी मधील विद्यार्थिनी भार्गवी गुरव व सिनियर केजी मधील गर्वेश भोई यांनी विशेष सहभाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान या विषयावर सादरीकरण करून "स्वच्छता हीच खरी सेवा" हा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवला.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लहान विद्यार्थी दक्ष लतेश पाटील याने महात्मा गांधींच्या वेशभूषेत हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या सादरीकरणातून बालमनात दडलेली निरागसता आणि राष्ट्रपुरुषांविषयीची आदरभावना स्पष्टपणे प्रकट झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी चौधरी यांनी केले. आभार प्रबोधन मोनाली पाटील यांनी केले तर कार्यक्रमाला हर्षदा चौधरी यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे भान, अहिंसा व प्रामाणिकतेची जाणीव आणि राष्ट्रनायकांविषयी आदराची भावना दृढ झाली. अशा उपक्रमांतून बालमनोवृत्ती घडवून उज्ज्वल समाज घडविण्याचा संदेश यशस्वीपणे पोहोचवण्यात आला.
