राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय: ३१ ऑगस्ट 'भटके मुक्ती दिवस' म्हणून साजरा होणार
♦️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार- राजू सूर्यवंशी
बोराडी,ता. शिरपूर दि.३०(प्रतिनिधी):- गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, राज्य शासनाने येत्या ३१ ऑगस्ट रोजी 'भटके मुक्ती दिवस' साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा दिवस आपल्या समाजाच्या संघर्षाचा आणि सन्मानाचा प्रतीक आहे. त्यामुळे, सर्व भटक्या समाज बांधवांनी आपापल्या गावांमध्ये, तालुका आणि जिल्हा स्तरावर एकत्र येऊन हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन मी आपल्या सर्वांना करत आहे.
स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे झाली, पण भटक्या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नव्हता. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू होते. ९ जून २०१५ रोजी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना जंतर-मंतर येथे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्ये लातूर येथील वडार समाजाच्या मेळाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले होते.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतरही हा लढा थांबला नाही. शिरपूर येथे विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. त्यात धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भटक्या शिक्षक आघाडीचे नेते संजय गोसावी, प्रसाद गोसावी, लक्ष्मण गोपाळ, पिंटू बंजारा यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सत्तेत परत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भटक्या समाजाच्या विकासासाठी छोट्या आर्थिक विकास महामंडळांची स्थापना केली आणि दिलेला शब्द पाळला. याबद्दल आपण सर्वजण त्यांचे आभारी आहोत.
या चळवळीत अनेकांचे योगदान आहे. राज्यातील भटक्या आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात फिरून समाजाच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या शासनापर्यंत पोहोचवल्या.
त्यांच्यामुळेच हा विषय अधिक प्रभावीपणे मांडला गेला. तसेच, उत्तर महाराष्ट्रात या चळवळीची मुहूर्तमेढ कै. विनायक गोसावी (कापडणे), कै. अशोक तिरमले (वडार समाजाचे नेते), कै. एस. एस. पवार आणि कै. धोंडू शिंदे यांनी १९८० पासूनच केली होती. या सर्व नेत्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच आज हा दिवस साजरा करणे शक्य झाले आहे.
हा दिवस कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या कामामुळे साध्य झाला नाही, तर सर्व भटक्या समाजाच्या एकजुटीमुळे आणि सातत्यपूर्ण संघर्षातून हे यश मिळाले आहे. चला, आपण सर्वजण मिळून ३१ ऑगस्ट हा दिवस ऐतिहासिक बनवूया!