गोरगावले येथील प्रेरणा बाविस्करची नगररचना अधिकारी पदावर नियुक्ती
चोपडा दि.२७(प्रतिनिधी):-* तालुक्यातील गोरगावले बुद्रुकचे माजी सरपंच श्री.व सौ.आशाबाई जगन्नाथ बाविस्कर यांची पुतणी कु. प्रेरणा हिने आधीच सन २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती परीक्षेत नाशिक विभागातून मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला होता. सध्या ती चोपडा येथील निम्न तापी पुनर्वसन विभागात सहाय्यक सिव्हिल अभियंता ह्या पदावर कार्यरत असतांना सन २०२५ मध्ये नगररचना (टाऊन प्लॅनिंग) विभागातील वर्ग-२ च्या अधिकारी पदासाठी झालेल्या परिक्षेत राज्यातून मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान तिने मिळवला आहे. विशेष म्हणजे दोन्ही परीक्षांमध्ये त्या प्रवर्गात मुलींसाठी एकेकच जागा होती. सध्या तिची अर्जुनी मोरगाव नगरपंचायत (जि.गोंदिया) येथे नगररचना अधिकारी वर्ग-२ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तिचे आजोबा कोळंबा जि.प.शाळेचे आदर्श मुख्याध्यापक स्व.तुळशीराम कामाजी बाविस्कर व आजी श्रीमती.जावित्रीबाई बाविस्कर यांनी तिच्या जन्माच्या वेळी तिचे नाव प्रेरणा ठेवले होते. तिने त्या नावाचे सार्थक करून बाविस्कर परिवारासाठी प्रेरणादायी भरारी घेतलेली आहे. कु. प्रेरणा ही गोरगावले माध्य.विद्यालयाचे संचालक प्रेमनाथ बाविस्कर व चोपडा येथील म.गांधी प्राथ. विद्यालयाच्या प्राथ. शिक्षिका सौ. सुरेखाबाई बाविस्कर यांची मुलगी आहे. तिचे पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्य.शिक्षण चोपडा येथेच झालेले आहे. नाशिक येथे आयआयटीचा अभ्यास करून शिरपूरच्या आर.सी.पटेल महाविद्यालयात बी.ई. सिव्हिलचे शिक्षण घेऊन बी.टेक.ची परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली आहे. मध्यंतरीच्या काळात ती घरीच रात्रंदिवस अभ्यास करीत राहिली. आधी जलसंपदा विभागात व आता नगररचना विभागात वर्ग-२ चे अधिकारी होण्याचा मान तिने मिळवला आहे. तिच्या ह्या यशात परिवारातील सर्व सदस्यांचे सहकार्य व गुरुजनांचे मार्गदर्शन मिळाले, असे ती सांगते. यापुढेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवणार असून वर्ग-१ चे अधिकारी होण्याचा तिचा संकल्प आहे. तिच्या ह्या यशाबद्दल चोपडा व जळगाव कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच गोंदिया क्राईम ब्रंचचे पोलिस अधिकारी शरद सैंदाणे, अर्जुनी मोरगाव पो.स्टे.चे पोलीस अधिकारी, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगरसेवक, कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.