शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ नियोजनासाठी सहविचार सभा संपन्न
जळगाव, दि. ४ जुलै (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे नियोजन व आयोजन संदर्भात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. ही बैठक आज सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे खेळीमेळीत वातावरणात पार पडली.
या बैठकीत जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शारीरिक शिक्षण महासंघ, क्रीडा शिक्षक संघटना व विविध क्रीडा मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक यांनी प्रास्ताविक करत स्पर्धांचे सविस्तर नियोजन, क्रीडा गुण सवलत, क्रीडा प्रमाणपत्रे, क्रीडा व युवा पुरस्कार, व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजनेबाबत माहिती दिली.
सदर शैक्षणिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सिंथेटिक ट्रॅकचे काम सुरु असल्यामुळे मैदानी व सांघिक स्पर्धांसाठी एकलव्य क्रीडा संकुलचा पर्याय निवडण्यात आला. स्पर्धांची सुरुवात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेने होणार असून १५ व १७ वर्षे वयोगटातील मुले-मुलींच्या संघ तयार करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले.
सहविचार सभेत Train the Trainers संकल्पना मांडण्यात आली. त्याअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी खेळ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी संघटनांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. तसेच पंच प्रशिक्षण कार्यशाळा व क्रीडा कौशल्यविकासासाठी मार्गदर्शक कार्यशाळा घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
सातपुडा पर्वतरांगेतील चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये १०० किमी सायकल स्पर्धा/मॅरेथॉन आयोजित करण्याची नावीन्यपूर्ण योजना यावेळी सादर करण्यात आली.
या वेळी श्री. प्रदीप तळवेलकर, श्री. राजेश जाधव, श्री. अजय देशमुख, श्री. प्रशांत कोल्हे, प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, श्री. फारुक शेख, श्री. प्रदीप साखरे, श्री. खुशाल देशमुख यांनी गतवर्षीच्या अडचणी व यशस्वी उपक्रमांबाबत आपले विचार मांडले. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी समस्यांवरील उपायांची माहिती दिली.
अंतिम सत्रात आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल प्रशिक्षक व राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. किशोर चौधरी यांचा थायलंड येथे आशियाई स्पर्धेत भारतीय संघाने कास्य पदक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याबद्दल क्रीडा विभागाच्या कु. काजल भाकरे यांचाही सत्कार झाला.