चौगाव किल्ला, त्रिवेणी संगम व धबधब्याने फुलले नयनरम्य सौंदर्य

 चौगाव किल्ला, त्रिवेणी संगम व धबधब्याने फुलले नयनरम्य सौंदर्य 


चोपडा,दि.३( प्रतिनिधी) - पावसाळ्याचे दिवस म्हटले म्हणजे ओले हिरवे दिवस, बहरून आलेला निसर्ग, खळखळ आवाज करीत वाहाणारे ओढे नाले आणि ओसंडून वाहणारे धबधबे.आणि अशातच पर्यटक, निसर्गप्रेमी आणि दुर्ग सेवक यांना वेड लागतं ते गडकोटांचं आणि तिर्थक्षेत्रांचं.

       असाच एक खान्देशातील डोंगरी किल्ला म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चोपडा पासून अवघ्या बारा कि.मी.चौगाव या खेडेगावापासून चार किमी वर असलेला" चौगावचा किल्ला" बाराव्या शतकातील अहीर (गवळी) राजांच्या काळात भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा किल्ला.हिरवाईने नटलेला सुमारे ९०० वर्षापुर्वीचा हा किल्ला आजही सुस्थितीत आहे.दोन दरवाजे,सप्ततलावांचा समुह, भुयारी मार्ग जे आज दबले गेलेले आहेत.सुमारे दहा गुंठ्यांत आजही तग धरून उभा असलेला गवळी वाडा, तटबंदी, बुरुज,पडक्या अवस्थेत असलेले आई भवानीचे मंदिर आणि शालिवाहन काळातील अखंड दगडात कोरलेल्या लेण्या ही अवशेष आहेत.किल्ल्याच्या बाजूलाच असलेला, डोंगरदऱ्यांच्या कुशीत लपलेला आणि जणू सौंदर्याची खाण असलेला जळगाव जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा जो आज ओसांडून वाहात आहे.आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू पाहत आहे.किल्याच्या अलिकडे त्याच काळातील पण सन १९२६ मध्ये श्री स्वामी शांतानंद गौरी शंकर महाराज रामटेकवाले यांनी जिर्णोद्धार केलेले महादेवाचे पुरातन मंदिर आहे.त्याच्या बाजूलाच दर्याखोर्यातून वाहत येणाऱ्या तीन नाल्यांचा संगम आहे.म्हणूनच त्याला त्रिवेणी संगम व मंदिराला त्रिवेणी महादेव मंदिर असे म्हणतात.हिरवाईने नटलेल्या या परीसरात रान हळद, सफेद मुसळी, लाल गुंज,जंगली कांदा,कडूखुळा, इत्यादी आयुर्वेदिक औषधी तर टेंभुर्णी,कटोरले,बेल, हिरडा, बेहडा,आवळा, करवंद, गवळीनचे फळ,धामण इत्यादी रानमेवा चाखायला मिळतो.तसेच या परीसरात  नीलगाय, अस्वल,मोर, घोरपड, रानडुक्कर, ससा, कोल्हा, हरीण, वानर,तडस इत्यादी जंगली प्राणी आढळतात.

 सध्या येथे पर्यटकांसाठी दिशा दर्शक पाट्या, बैठक आसन व निरीक्षण मनोरा उभारला जात असला तरी अनेक सुविधांचा अभाव आहे.रस्ता, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, लाईट, पर्यटकांसाठी निवास, किल्ल्याला पायर्या,पडलेले मंदिर, ढासळत चाललेल्या तटबंदी, बुरुज व अवशेष दुरुस्ती होणे आवश्यक आहे.अन्यथा हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीसाठी शिल्लक राहणार नाही.या भागात पावसाळ्यात हजारो पर्यटक, निसर्गप्रेमी येत असतात.तरी किल्ल्याला पर्यटनाचा दर्जा मिळावा  व प्रादेशिक पर्यटन विकास विभाग व वन पर्यटन मधून नीधी मिळून हा ऐतिहासिक वारसा जपला जावा, चौगाव किल्ल्याची पुरातत्त्व विभागात नोंद व्हावी आणि तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर ज्याला तिर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे तो आता ब दर्जा मिळावा हिच मागणी जळगाव जिल्ह्यातून आणि विशेष करून चोपडा तालुक्यातून होतांना दिसत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने