दर्जेदार साहित्यामुळे मानसिक स्वास्थ्यात सुधारणा विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन
चोपडा येथे कवी अशोक सोनवणे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात बोलत ते होते. प्रताप विद्या मंदिराच्या प्रार्थना सभागृहात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. रमेश वानखेडे (नाशिक), प्रकाशित कवितासंग्रहावर भाष्य करणारे प्रा. डॉ. तुषार चांदवडकर (नाशिक), आर्ष पब्लिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रा. दिलीप चव्हाण (पुणे), चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी मयूर, विवेकानंद शैक्षणिक व संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर यांच्यासह कवी अशोक नीलकंठ सोनवणे हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी व आभार प्रदर्शन पंकज शिंदे यांनी केले. मंचावर उपस्थित मान्यवरांचा परिचय विलास पाटील, पंकज शिंदे, प्रा. डॉ. अनंत देशमुख यांनी करुन दिला.
यावेळी ज्येष्ठ समीक्षक प्रा. रमेश वरखेडे बोलतांना म्हणाले, 'परिस्थितीच्या दुसेरीखाली' या कवितासंग्रहात आजूबाजूच्या बाह्य घटकांचे संदर्भ थोडेफार असले तरी प्रामुख्याने त्या घटकांचे व घटनांचे मनावरचे ओरखडे हा प्रमुख विषय आहे. मानव्याची प्रातिनिधिक अभिव्यक्ती असलेली सार्वत्रिक मूल्य असणारी कविता या संग्रहात आहे. 'परिस्थितीच्या दुसेरीखाली' ही एक विराणी असून सूत्रप्रतिमा या काव्यसंग्रहाचा गाभा आहे. यात शेतकऱ्याचे प्रातिनिधीक चरित्र असून व्यक्तीचित्रांची एक मालिका आहे. लोकसंस्कृतीची वास्तव चित्रे निकामी होत चालल्याची भावना यातून स्पष्टपणे पुढे येते. समाजाच्या वेदनांचा चेहरा या कवितांना आहे. हे आधुनिकोत्तर काव्य म्हणजे सृजनशील मनाची चित्रकथा आहे. बोलतांना प्रा. वरखेडे यांनी कविता संग्रहातील अनेक कवितांचे चिंतनशील विश्लेषण केले.
प्रकाशित कवितासंग्रहावर भाष्य करताना प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी 'परिस्थितीच्या दुसेरीखाली' या कवितासंग्रहाचा नायक जरी शेतकरी असला तरी आजच्या समाजातलं दुभंगलेपण हे देखील या कवितासंग्रहाच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले. यातील कवितेचे जिवंतपण हे अनुभवातून आलेले असून यात वेदनामय, कारुण्यमय निसर्ग आपल्याला भेटतो. बाईपण आणि मातृत्वाच्या प्रतिमा या संग्रहात असून स्त्रियांच्या अस्तित्वभानाचा विचार ताकदीने मांडण्यात आला आहे. समाजाच्या दाबलेल्या भावनांचा हुंकार या कवितेत असून आजच्या जगण्यातली अस्वस्थता वेगवेगळ्या प्रतिमांमधून चित्रित केली गेली आहे. बाप आणि मुलाचे भावविश्व ताकदीने शब्दबद्ध केले असून आत्मभान जागवणारा हा कवितासंग्रह आहे, असेही ते म्हणाले.
कवी अशोक सोनवणे यांनी व प्रा. डॉ. कविता सोनवणे यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. प्रकाशनस्थळी किरण पाटील (किरणस् क्रियेशन, नाशिक) यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला सेल्फी पॉइंट लक्षवेधक होता. पंकज नागपुरे यांनी आकर्षक फलक लेखन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असो मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.