चोपड्यात सोमवारपासून मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमाला
- चोपडादि.८(प्रतिनिधी) - येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे च्या चोपडा शाखेतर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचा शुभारंभ १० फेब्रुवारी रोजी होत असून १२ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये विविध विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधला जाणार आहे.
पंकज नगर येथील पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात दररोज रात्री ८.३० वाजता होणाऱ्या या ५ व्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पिंपळगाव बसवंत येथील सेवानिवृत्त प्राचार्य कवी लक्ष्मण महाडिक हे 'सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत?' या विषयावर गुंफणार आहेत. या व्याख्यानाचे प्रायोजक डॉ. विकास हरताळकर, श्रीमती शोभा सुरेश शिंपी, भूपेंद्र लक्ष्मण पाटील हे आहेत. तर ११ फेब्रुवारी रोजी 'तिची तीन रूपे :आई- बाई-सई' या विषयावर नाशिक येथील लेखक, समीक्षक डॉ. प्रा. तुषार चांदवडकर हे गुंफणार असून या व्याख्यानाचे प्रायोजकत्व घनश्याम अग्रवाल, विश्वास दलाल व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी स्वीकारले आहे. १२ फेब्रुवारी रोजी मसाप परिवारातील सदस्य विविध हास्य कविता, विडंबने, वात्रटिका व विनोदी किस्स्यांची 'हास्यभेळ' सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ. तृप्ती व डॉ. राहुल पाटील ॲड. डी. पी. पाटील, डॉ .प्रा. किशोर एन .सोनवणे, संजीव शेटे हे आहेत.
व्याख्यानमालेच्या या कार्यक्रमास चोपडेकर रसिक श्रोत्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन चोपडा शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी केले आहे.