विनोद हे मानवी जीवनात दैनंदिन कामाचे ओझ कमी करण्याचे औषध ..महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्रोते हसून हसून लोटपोट

 विनोद हे मानवी जीवनात दैनंदिन कामाचे ओझ कमी करण्याचे औषध ..महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्रोते हसून हसून लोटपोट 

चोपडादि.१३(प्रतिनिधी) - विनोद हा मानवी जीवनात दैनंदिन कामाच्या ओझ्यातून आनंदानुभुती देण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्राचीन भारतीय परंपरेतील नवरसांपैकी एक असलेल्या हास्य रसाची अनुभूती देत उपस्थित श्रोत्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेच्या कलावंतांनी मनमुराद हसवले.

        पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात झालेल्या प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफण्यापूर्वी शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रायोजक डॉ. राहुल - डॉ. तृप्ती पाटील, प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विलास पी पाटील यांनी तर सूत्रसंचालन तुषार लोहार यांनी केले. 

           पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात झालेल्या प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना मसाप सदस्यांनी सादर केलेल्या या 'हास्यभेळ' मध्ये व्हॅलेंटाईन, चला बापू तुम्हाला तुमचे ग्रामस्वराज्य दाखवतो या कविता चंदन पवार यांनी सादर करत विद्यमान परिस्थितीवर भाष्य केले. तर कवयित्री योगिता पाटील यांनी आपल्या 'अरे चोपडा चोपडा रस्तोरस्ती खड्ड्यांचा पसारा..., ओळखलंत का साहेब मला...., मनाचे श्लोक' या विडंबनामनधून 

राजकारणातील प्रवृत्तीवर कोरडे ओढत उपस्थितांना आनंद दिला. 'ओळख नववधूशी' ही विनोदी कविता सादर करतांना पंकज शिंदे यांनी पत्नीच्या स्वभावातील वैशिष्ट्ये मांडत उपस्थितांना हसवले. 'तुझ्यासाठी घेतली मी चक्की उधार' या विडंबनातून आणि 'सौंदर्याचे स्वप्न' या कवितेतून तुषार लोहार झालेली फजिती मांडली. एस. टी. बस मधील विनोद सांगत व 'भुताचे भारुड' सादर करुन प्रभाकर महाजन यांनी वेगळी अनुभूती उपस्थित श्रोत्यांना दिली. गौरव महाले यांनी वैभव जोशी यांची 'एक पेग म्हणता म्हणता...' ही विनोदी कविता प्रभावीपणे सादर केली. स्त्रियांच्या साडी प्रेमाचा किस्सा त्यांनी यावेळी सांगत विनोदाचा आनंद दिला. 'मी कापतो गळा' या कवितेतून अपेक्षा भांगातून निर्माण होणाऱ्या विनोदाची प्रचिती संजय बारी यांनी श्रोत्यांना दिली. 'पैकेल पाव्हणा' ही अहिराणी कविता सादर करुन एस. एच. पाटील यांनी सतत येणाऱ्या पाहुण्यांवर विनोदी ढंगाने टीका केली. वात्रटिका, विडंबनं आणि विनोदी किस्से सांगत विलास पी.  पाटील यांनी दैनंदिन जीवनातील व्यंगावर विनोदी पद्धतीने भाष्य करत श्रोत्यांना हसवले.

यावेळी शाखेचे अध्यक्ष कवी अशोक सोनवणे यांनी चोपडा शाखेतर्फे सुरु असलेल्या या उपक्रमात चोपडेकर रसिकांची मिळत असलेली साथ ही उत्साह वाढवणारी असल्याचे सांगत मसाप परिवारातील सदस्य घेत असलेल्या परिश्रमाबद्दल कौतुक केले. प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्या साऱ्यांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमास रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रसिकांनी टाळ्यांच्या भरभरून प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

           सेवा पुरस्कार वितरण - यावेळी सेवा मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा गौरव पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थीमध्ये अहिल्याबाई होळकर हायस्कूल, कमाळगव येथील कलाशिक्षक अर्जुन देवकीनंदन कोळी, पंकज माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षिका विजया अनिल पाटील, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मधुकर पाटील यांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने