सावित्रीबाई फुले यांनी सांस्कृतिक गुलामगिरी मोडून काढली : जयसिंग वाघ
जळगाव दि.३(प्रतिनिधी) :- भारतातच नाही तर संपूर्ण जगात धर्म व संस्कृतीच्या नावाखाली महिलांचे शोषण हजारो वर्षांपासून सुरू होते . स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते , चूल आणि मूल एवढेच तिचे विश्व होते . अश्या काळात सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची , पुरुषाच्या बरोबरीची चळवळ चालून त्यांनी स्त्रियांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणून देशातील सांस्कृतिक गुलामगिरी मोडून काढली असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
रुक्मिणी नगर , जळगाव येथील मंगलमैत्रि बुद्धविहारात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते . आपल्या भाषणात जयसिंग वाघ यांनी सांगितले की, महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई यांनी समाज परिवर्तनाचा लढा लढला , केवळ पतीला साथ द्यावी म्हणून त्या लढ्यात उतरलेल्या नाहीत तर या देशातील धर्म , संस्कृती , सामाजिक परिस्थिती त्यांनी अभ्यासली होती , या बाबत त्यांचे स्वतंत्र विचार होते व या लढ्यात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना सामोरे जाण्याचे व ते अडथळे दूर करण्याचे धाडस त्यांच्यात होते , महात्मा फुले यांच्या मुळे त्यांना यात काम करणे सोपे झाले हे सत्य असेल तरी त्यांच्या एकट्याच्या माथी जरी या लढ्याची जबाबदारी आली असती तरी त्यांनी खंबीरतेने हा लढा लढलाच असता असेही वाघ यांनी विविध उदाहरणे देवून स्पष्ट केले .
प्रा. प्रितलाल पवार यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेत स्त्रियांविषयी असलेली जनभावना मांडून त्यांना घरात बंदिस्त ठेवल्याने त्यांची झालेली अधोगती व त्या समाजव्यवस्थे विरुद्ध सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष मांडला . ज्योती भालेराव यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा आढावा घेवून त्यांचं शैक्षणिक कार्य विस्ताराने मांडले. सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा संगीता निकम या मुलीने केली होती . त्या मुलीने मी सावित्री बोलते या माध्यमातून विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रियांका अहिरे होत्या . सूत्रसंचालन विद्या झनके , आभार राधा जवरे यांनी केले . यशस्वीतेसाठी ज्योती दाभाडे , सुषमा इंगळे , शोभा इंगळे , प्रमिला निकम , भारती बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले .उषा तायडे , शारदा इंगळे , उषा इंगळे , कमल वाघ , नर्मदा भालेराव , मंगला सपकाळे , आशा केदारे , छाया इंगळे , वंदना वानखेडे आदी महिला पदाधिकारी प्रामुख्याने हजर होत्या .