देशाचा विकास तरुणांच्या हातात -अरुणभाई गुजराथी ;
रोटरी क्लब चोपडातर्फे 'रायला'चे आयोजन
चोपडा,दि.2(प्रतिनिधी) - देशाचा विकासा हा तरुणांच्या हातात असून देशातील तरुण हा निर्व्यसनी, उद्योगी व नेहमी प्रेरणादायी असावा. त्याने जीवनात आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी चिकाटीने कार्य करावे. युवकांजवळ ध्यास, विश्वास आणि आत्मविश्वास असला पाहिजे. यासाठी रोटरी क्लबतर्फे आयोजित केला जाणाऱ्या रुरल युथ लिडरशिप अवार्ड (रायला) सारख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व स्वविकासासोबत समाज व राष्ट्राचा विकास करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे सत्रासेन डी. आर. बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आयोजित दोन दिवसीय रायला उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. समारोप प्रसंगी मंचावर नाशिक येथील प्रसिद्ध उद्योजिका रोटे. प्रेरणा बेळे, रोटे. ज्ञानेश्वर भादले, सत्रासेन येथील सरपंच व आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना भादले, रोटे. नितीन अहिरराव (डिस्ट्रिक्ट जॉईंट सेक्रेटरी), प्रकल्प प्रमुख पंकज बोरोले, क्लब प्रेसिडेंट डॉ. ईश्वर सौंदाणकर व सचिव भालचंद्र पवार हे उपस्थित होते. यावेळी शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. तसेच सौ प्रेरणा बेळे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे संजय बारी यांनी, प्रास्ताविक डॉ. ईश्वर सौंदाणकर, आभार प्रदर्शन शिवाजी पवार यांनी केले. या प्रकल्पासाठी चोपडा तालुक्यातील समाजकार्य महाविद्यालय व पंकज वरिष्ठ महाविद्यालय येथील १०८ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झालेले होते.
तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या नेतृत्व विकास, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक व भावनिक विकास व्हावा म्हणून रोटरी क्लब ऑफ चोपडा तालुक्यात गेल्या ५४ वर्षात प्रथमच रायला हा प्रकल्प घेण्यात आला. या प्रकल्पासाठी रोटरीचे भावी प्रांतपाल डॉ. राजेश पाटील उद्घाटक म्हणून तर सुनील सुखवानी (माजी अध्यक्ष रोटरी क्लब जळगाव) व ज्ञानेश्वर भादले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ३० नोव्हेंबर रोजी उद्घाटनप्रसंगी मंचावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर, प्रकल्प प्रमुख पंकज बोरोले, सहप्रकल्प प्रमुख गौरव महाले व सचिव भालचंद्र पवार हे उपस्थित होते. उद्घाटन सत्रात रोटे. डॉ. राजेश पाटील यांनी स्वतःमधील गुण कोणते आहेत ते स्वतः किंवा इतरांच्या मार्गदर्शनाने ओळखले पाहिजे व त्याचा विकास करायला हवा, असे करणारा व्यक्तीच जीवनात यशस्वी होवू शकतो, असे मत व्यक्त केले.
प्रथम सत्रात जळगाव येथून रोटरी क्लब ऑफ जळगांव बेस्टचे माजीं प्रेसिडेंट गणी मेमन यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्त्व विकासासाठी समाजात वावरताना मित्र-आई-वडील व आपण स्वतःचा सर्वांगीण विकास कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात धुळे येथील पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. विलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी वेगवेगळे खेळ घेतले व त्या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने विकास करता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तर तृतीय सत्रात डॉ. आयुब पिंजारी (अनिस) यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती,भोंदूगिरी तसेच समाजातील विपरीत रूढी परंपरा याबाबत वैज्ञानिक प्रयोगातून माहिती दिली. चतुर्थ सत्रात पंकज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय पाटील यांनी युवकांना साहस विकास कार्यक्रम बाबत मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रात रोटे. गौरव महाले यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना प्रश्नोत्तर स्वरूपात करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले. रात्री विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी प्रा. डॉ. राहुल निकम यांनी योगाचे फायदे सांगत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यानंतर प्रा. वळवी सर व अनिल बाविस्कर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी जंगल सफरीचा आनंद घेतला व निसर्गाची ओळख करुन घेतली. अखेरच्या सत्रात विद्यार्थ्यांना सर्पमित्र कुशल अग्रवाल यांनी सापांविषयी समज गैरसमज, उपाययोजना याबाबतचे मार्गदर्शन केले.
रायला प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी रोटे. आदित्य अग्रवाल, प्रदीप पाटील, प्रवीण मिस्तरी, चंद्रशेखर साखरे, नंदकिशोर पाटील, आशिष गुजराथी, संजीव गुजराथी, विलास एस. पाटील, विलास पी. पाटील, विश्र्वास दलाल, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आशिष गुजराथी, डॉ. अनंत देशमुख, डॉ. संबोधी देशपांडे, अजय भाट व चंदू पाटील यांनी अनमोल असे सहकार्य केले.