चोपड्यातील तीन अर्ज बाद..उमेदवार मात्र तेवढेच..
चोपडादि.30 (प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १६ उमेदवारांनी 23 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या दालनात उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी आणि प्राधिकृत केलेल्या व्यक्तींच्या समोर उमेदवारी अर्जांची छाननी संपन्न झाली. यात दोन उमेदवारांचे तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले. पण उमेदवारांनी आधीच अतिरिक्त अर्ज भरून ठेवल्यामुळे अर्ज बाद झाल्यावर देखील उमेदवारांची संख्या मात्र तेवढीच अर्थात 16 एवढी राहिली आहे.
छाननी दरम्यान गौरव चंद्रकांत सोनवणे यांचे दोन अर्ज पक्षाचे एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरवले गेले तर अपक्ष म्हणून त्यांनी भरलेला अर्ज वैध ठरला आहे. तसेच साहेबराव कौतिक सैंदाणे यांचा एक अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध तर अपक्ष म्हणून भरलेला दुसरा अर्ज वैध ठरला आहे. इतर सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. म्हणजेच छाननी नंतर आता एकूण १६ उमेदवारांचे २० अर्ज वैध ठरले आहेत.
उमेदवारांना स्वतः माघार घेण्याचा कालावधी ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर २०२४ दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. या कालावधीत उमेदवार माघार घेऊ शकतात. या मुदतीनंतर ४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेनंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यावेळी स्वतः उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
छाननी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, तसेच निवडणूक कर्तव्यार्थ नेमण्यात आलेले कर्मचारी उपस्थित होते.