चोपडा विधानसभा मतदारसंघात सध्या दुरंगी लढत पक्की.. अपक्षांची गर्दी अजून बाकी..!
चोपडा,दि.२५(प्रतिनिधी)विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना(शिंदे) पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची उमेदवारी नुकतीच जाहीर झाली आहे .तर दुसरीकडे उबाठा गटातर्फे राजू तडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या इच्छूकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. अन्य कोणता पक्ष, अन्य कोणाला उमेदवारी देतो का? याकडे जनतेच्या नजरा लागून आहेत .आज तरी निवडणूक आखाड्यात राष्ट्रीय पक्षांमार्फत दोन उमेदवार फायनल झाले असून अपक्ष उमेदवारांची गर्दी बघायला मिळण्याची शक्यता आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जागा सुटल्यावरही शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याची आशा होती.मात्र शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली त्यात चोपडा नसल्याने अनेकांच्या ईच्छेवर पाणी फीरले आहे.तर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू तडवी यांचे नाव जाहीर होताच अनेकांना विश्वास वाटतच नव्हता शेवटी उबाठाची अधिकृत दुसरी यादी जाहीर झाल्याने शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.आजच्या तारखेपर्यंत तहसील कार्यालयामार्फत ३१ जणांना ६६ उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात आल्याची माहिती दिली असल्याने अपक्षांची भावूगर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.