चोपड्यात मसापची वार्षिक सभा उत्साहात

 चोपड्यात मसापची वार्षिक सभा उत्साहात

चोपडा दि.२२(प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या चोपडा शाखेची  सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. जुन्या शिरपूर रोडवरील श्री अष्टविनायक मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी शाखेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे हे होते. यावेळी मंचावर शाखेचे उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, विश्वस्त मंडळाचे कार्यवाह श्रीकांत नेवे, डॉ. विकास हरताळकर हे होते. 

       आरंभी शाखेचे कार्यवाह गौरव महाले यांनी अहवाल वाचन केले. तर प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी आर्थिक ताळेबंद सादर केला. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. यावेळी चर्चेत सहभागी होत विलास पं. पाटील यांनी निधी उभारण्यासाठी शाखेतर्फे दिनदर्शिका प्रकाशित केली जावी, अशी सूचना मांडली. तर श्रीकांत नेवे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिल्याबद्दल केंद्र शासनाच्या अभिनंदनचा ठराव मांडला. तर डॉ. राहुल पाटील यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेसाठी शहरात शासनातर्फे भूखंड मागणी करून त्यावर मराठी भाषेच्या प्रचार प्रचारासाठी इमारत उभी करावी अशी इच्छा व्यक्त केली. रुपेश पाटील यांनी वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी शाखेतर्फे वाचनालय सुरू करण्याची यावेळी सूचना मांडली. अध्यक्षीय मनोगतात अशोक सोनवणे यांनी मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी शाखेतर्फे घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. तसेच केंद्रीय कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या सूचनांबाबत शाखा सदस्यांना अवगत केले. 

       यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या, विविध पदांवर निवड झालेल्या तसेच पुरस्कारांनी गौरविल्या गेलेल्या विलास पं. पाटील, विलास सु. पाटील, राजेंद्र पारे, डॉ. ईश्वर सौंदाणकर, नरेंद्र भावे, सुनील पाटील, भालचंद्र पवार, भास्कर पाटील, देवेंद्र पाटील, पंकज शिंदे, वैशाली चौधरी, संजय बारी या शाखा सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाखा सदस्य राकेश विसपुते यांनी आकर्षक रांगोळी काढली होती.

       वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित मैफलीत डॉ. लोकेंद्र महाजन, तुषार लोहार, ए. पी. पाटील, योगिता पाटील, जयश्री महाले, गौरव महाले यांनी यावेळी गीते, कविता सादर केल्या. तर रुपेश पाटील यांनी विनोदी किस्से सांगितले. यावेळी शाखेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने