गांधी विचारांचा पगडा असलेल्या आई 'चंद्रकले'चा शीतप्रकाश निमला..

  गांधी विचारांचा पगडा असलेल्या आई  'चंद्रकले'चा शीतप्रकाश निमला..

                 पले पिता थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊ उर्फ मगनलाल नगीनदास गुजराथी यांच्या संस्कारातून मिळालेल्या स्वातंत्र्यलढ्याचे बाळकडू मातोश्री स्व.चंद्रकलाआई यांना बालपणीच मिळाले होते. स्वातंत्र्यचळवळीचा आपल्या कुटुंबातील हा स्वातंत्रलढा पाहत आणि अनुभवत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी मिठाच्या सत्याग्रहातून आणलेल्या मिठाच्या पुड्यांची चोपड्यात विक्री सुरू झाली होती. त्यावेळी त्यांचे वडील म्हणजेच स्व. मगनभाऊंनी त्या काळात एक मिठाची पुडी 251 रुपयांना विकत घेऊन सविनय कायदेभंग केला होता. त्याबद्दल त्यांना अटक होऊन चार महिने सक्त मजुरी व दोनशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस शिक्षा सुनावण्यात आली होती. चंद्रकलाआईंनी हा सारा स्वतंत्र लढा स्वतः अनुभवला होता. म्हणून त्याच्या मनातही देशभक्तीची ज्योत पेटली होती.

                अशातच पुढे त्यांचा विवाह स्व डॉ परमानंद मयूर यांच्यासोबत झाला. गांधी विचारांचा जबरदस्त पकडा असणाऱ्या या स्वातंत्र्य सैनिकांच्या विवाहाला साने गुरुजी स्वतः उपस्थित होते हे विशेष.डॉ परमानंद मयूर यांनी देखील स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनाही तुरुंगवास झाला होता. आपले पिता आणि पती दोघांनीही स्वातंत्र्यचळवळीसाठी तुरुंगवास पत्करला पण देशसेवेचे व्रत सोडले नाही हे पाहून याच देशभक्तीचा वसा त्यांनी घेतला नसता तर नवलच.अशाप्रकारे माहेरी आणि सासरी अशा दोन्ही ठिकाणी स्वातंत्र्यलढा अनुभवणाऱ्या चंद्रकलाआईंच्या मनावर गांधी विचारांचा पगडा बसला नसता तर नवलच...

         आपल्या पुढच्या पिढीतील आपल्या कुटुंबातही हा गांधीविचारांचा वारसा त्यांनी समर्थपणे रुजवला. केवळ अर्थार्जन करून श्रीमंत होण्यापेक्षा जनसामान्यांची सेवा करून खऱ्या अर्थाने श्रीमंती कमावण्याचा मंत्रच जणू त्यांनी पुढच्या पिढीला दिला. त्यांनी पेरलेल्या त्यांच्या या विचारांचे संस्कार स्व संध्याताई आणि आता माधुरीताईंच्या तसेच आदरणीय राजाभाई मयूर यांच्या चालण्या,बोलण्या, वागण्यातून सहज जाणवतात. चोपडा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजाभाई मयूर आणि त्यांच्या कुटुंबाला आपल्या पंखांखाली घेत त्यांनी आपल्या मायेच्या ओलाव्याने आपलंसं केलं.  आपल्या मातृत्वाच्या वात्सल्याची छत्रछाया त्यांनी राजाभाई मयूर आणि कुटुंबावर अखेर पर्यंत ठेवली. 

                *कुठलाही गाजावाजा न करता समाजासाठी काम करत प्रामाणिकपणे जगण्याचा त्यांचा संस्कार आजही मयूर कुटुंबात प्रत्यक्ष दिसतो.* त्याचेच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपल्या मृत्यूनंतर केलेले देहदान. "मरावे परी कीर्ती रुपी उरावे" या उक्तीला अनुसरून आपल्या विचारातून आणि कृतीतून आई शेवटच्या क्षणीही समाजाला संदेश देऊन गेल्या.

             साधारण सात आठ वर्षांपूर्वी एकदा आई आजारी पडल्या होत्या त्यावेळी त्यांच्या घरी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी आदरणीय माधुरीताईंनी आपल्या आईंची हस्तलिखित डायरी दाखवली. वयाच्या 80 वर्षानंतर देखील नियमितपणे वृत्तपत्रांचे वाचन करून त्यातून महत्त्वाच्या बाबींची आपल्या अत्यंत सुंदर अक्षरात नोंद घेणाऱ्या आईंचे मोत्यासारखे अक्षर आम्हा शिक्षकांनाही लाजवणारे होते. त्यानंतरही आता अगदी शेवटच्या दिवसापर्यंत वयाच्या 96 व्या वर्षापर्यंत त्यांनी आपले वाचन आणि अध्यात्मिक चिंतन सुरू ठेवले होते हे विशेष. 

          आपल्या शालीन, कुलीन,सुसंस्कृत, समंजस, सालस व्यक्तिमत्वाने सर्वांना आपलस करणाऱ्या चंद्रकला आईंनी आज आपला देह ठेवला. *आपल्या ममताच्या शीतप्रकाशात मोती महालाला न्हाऊ घालणाऱ्या 'चंद्रकले'चा शीतप्रकाश अखेर निमला.* पण त्यांनी दाखवलेला प्रकाश मार्ग मयूर कुटुंबाला सदैव प्रेरणा देत राहील. आज चंद्रकला आईंच्या जाण्याने मयूर कुटुंबातील चार पिढ्यांना जोडून ठेवणारा वटवृक्ष गेल्याची सल मनात असली तरी या वटवृक्षाच्या छायेत मयूर कुटुंबाला त्यांच्या विचारांची सावली सदैव साथ देत राहील या विश्वासाने स्वर्गीय आईंना शब्दरूपी आदरांजली ....

               

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने