रोटरी क्लब तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

रोटरी क्लब तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

चोपडा दि.२४(प्रतिनिधी)- येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे शहरातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या पाठीवरील ही शाबासकीची थाप त्यांचा भविष्यकालीन प्रवास आणखी उत्साहाने पूर्ण करण्यास नक्कीच प्रेरक ठरेल, असा विश्वास यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. 

शहरातील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे डॉ. प्रा. ईश्वर सौंदाणकर हे होते. तर विशेष अतिथी म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध वक्ते रामचंद्र पाटील, प्रमुख अतिथी म्हणून महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे सहसचिव नितीन अहिरराव यांच्यासह क्लबचे सचिव भालचंद्र पवार, सहसचिव संजय बारी, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील, प्रकल्प प्रमुख अरिफ शेख, सहप्रकल्प प्रमुख पृथ्वीसिंह राजपूत, सदस्य विलास पाटील, विलास पी. पाटील, जगदीश महाजन, चंद्रशेखर साखरे, लीना पाटील हे मंचावर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी 'चला उंच भरारी घेऊया या' विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करताना रामचंद्र पाटील यांनी सांगितले की, आयुष्यात नेहमीच व्यक्तीचा नव्हे तर व्यक्तिमत्वाचा, त्याच्या चांगुलपणाचा सत्कार होत असतो. आपण चांगली कृती केल्यास आपला अवश्य सत्कार होतो. चांगले काम म्हणजे जे काम करताना आपल्या मनाला लाज वाटत नाही असे काम होय. जो कुठले तरी सोंग घेऊन समाजात वावरत असतो त्याचा कधीही विकास होत नाही. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो आणि जगात कुठलाही जादूचा दिवा किंवा सोनपरी अस्तित्वात नाही. आपली मेहनतच आपल्याला यशाकडे नेत असते, म्हणून भान ठेवून नियोजन करावे आणि बेभान होऊन काम करावे यातच यश दडलेले आहे.

या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक रोटे. ईश्वर सौंदाणकर यांनी तर सूत्रसंचालन वनराज महाले यांनी व आभार प्रदर्शन पृथ्वीसिंह राजपूत यांनी केले. कार्यक्रमास शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परेश चित्ते, अजय भाट, देवेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने