मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्यात मिशन मोडवर काम

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्यात मिशन मोडवर काम

       






 जळगाव दि. 10 (प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभर लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जळगाव जिल्हाभरात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यासोबतच विविध उपाययोजना करण्या सोबतच ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

    संपूर्ण राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ' महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 28 जून 2024 पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत शासनामार्फत केली जाणार आहे. या योजनेची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच लाभार्थी महिला यांची फरपट होऊ नये यासाठी सर्व गट विकास अधिकारी यांनी दक्षता घेण्यासोबतच विविध उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांना बँक खाते उघडण्यासाठी तालुक्यातील बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधने व त्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांचे बँक खाते उघडले जातील याची सुनिश्चिती करणे, पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध असलेल्या जन्म दाखल्यांच्या अभिलेखातून ज्या लाभार्थ्यांना जन्म दाखला आवश्यक आहे, त्यांना जन्म दाखल्यांच्या नकला तात्काळ पुरवण्यासाठी नियोजन करणे, ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असलेल्या जन्म दाखल्यांच्या अभिलेखातून ज्या लाभार्थ्यांना जन्म दाखला आवश्यक आहे त्यांना जन्म दाखल्यांच्या नकला तात्काळ पुरवण्यासाठी नियोजन करणे व ग्रामसेवक यांना त्या दृष्टीने निर्देश देणे, योजनेच्या अंमलबजावणीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांना आवश्यक सहकार्य करणे, आपले सरकार सेवा केंद्रावर अर्ज स्वीकृती करणे तपासणी करणे, पोर्टल वर अपलोड करणे बाबतच्या कामकाजाचे नियोजन करणे, प्रत्येक गावात योजनेची दवंडी देऊन सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा प्रसार करणे यासाठी नियोजन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी नियोजनबद्ध रीतीने होईल, लाभार्थ्यांना सुलभ रीतीने योजनेचा लाभ मिळेल यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी तसेच सदर योजनेच्या अनुषंगाने अडचणी आल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

               ग्रामपंचायत पातळीवर अर्ज होणार उपलब्ध मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचा दृष्टीने व महिलांना अर्ज भरतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर या योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.लाभार्थी महिला,अंगणवाडी सेविका,बचत गटाचे अध्यक्ष ,सचिव, ग्रामसेवक हे या योजनेचे अर्ज भरुन देऊ शकतात.

  फॉर्म निशुल्क आहे, शुल्क देऊ नये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज दाखल करणे किवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क शासनातर्फे आकारले जात नाही. त्यामुळे लाभार्थी महिला किंवा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नये असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने