विधान परिषद निवडणुकीत ११ उमेदवार विजयी तर शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव

 विधान परिषद निवडणुकीत ११ उमेदवार विजयी  तर शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव 


मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी  शुक्रवार दि. १२ जुलै रोजी मतदान घेण्यात आले. यानंतर साधारण ५ वाजेला मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निकाल जाहीर झाला आहे. यात महायुतीचे सर्व ९ उमेदवार तर मविआचे मिलिंद नार्वेकर, कॉग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला आहे.

या निवडणुकीत भाजप ५, शिवसेना शिंदे गट २, राष्ट्रवादी अजित पवार गट २, शेतकरी कामगार पक्ष १, काँग्रेस १ व उबाठा शिवसेना १ असे १२ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार पडणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. अखेर निकालानंतर उत्सुकता संपली आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान २३ मते मिळवणे आवश्यक होते. निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांच्यासह मित्र पक्षाचे सदाभाऊ खोत, शिवसेना शिंदे गटाकडून विदर्भातील कृपाल तुमाने व भावना गवळी, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे सर्व विजयी झाले.तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव विजयी झाले. तर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना  पराभव स्वीकारावा लागला आहे. विधान भवनामध्ये शुक्रवारी सर्व २७४ आमदारांनी मतदान केले. इतर १४ आमदारांपैकी चौघांचे निधन झाले असून ७ जण लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर २ जणांनी राजीनामा दिला असून एक जण अपात्र झाल्यामुळे एकूण २७४ आमदारांचे मतदान होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने