चोपडा आगार राज्यात अव्वल..९२ गुण प्राप्त


चोपडा आगार राज्यात अव्वल..९२ गुण प्राप्त 

चोपडा,दि.१५(प्रतिनिधी ): प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील विविध विभागांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना रैंकिंग दिले जाते. गेल्या एप्रिल महिन्यात प्रवाशांना चांगल्या सुविधा, सुरक्षित प्रवास, उत्त्पन्न, इंधन बचतसह १० बाबींच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील चोपडा आगारास रैंकिंगमध्ये १०० पैकी ९२ गुण मिळाले. सर्वाधिक उत्पन्न देणारे चोपडा आगार एप्रिल महिन्यात राज्यात प्रथम क्रमांकाने आला आहे. 

चोपडा आगाराने उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य टिकून चांगले उत्पन्न मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळविले. याबद्दल विभागाचे नियंत्रक भगवान जगनोर यांनी आगारप्रमुख महेंद्र पाटील यांच्यासह प्रशासन व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले.

राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ही केवळ राज्यात सर्वत्र गावखेडी, वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सध्यास्थितीत राज्यभर एसटीचे जाळे पसरले आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध घटकांतील प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. त्यामुळे एसटीचा प्रवासी वर्गही मोठा आहे.

स्वच्छ व सुंदर बसस्थानक म्हणून नावलौकिक असलेले चोपडा आगारातर्फे उन्हाळी सुट्या व लग्नसराई लक्षात घेता पुणे, नाशिक, संभाजीनगर, सुरतसह जळगाव, धुळे या ठिकाणी जादा वाहतूक करून प्रवाशांना सुरक्षित व सुखकर सेवा दिल्या. विविध सुखसोयी उपलब्ध करून देऊन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध घटकांतील प्रवाशी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. चोपडा आगारात एकूण ७६ वाहने रोज जवळपास २९ हजार किलोमीटर धावतात. चालक १५७, वाहक १४६, प्रशासन ३८, कार्यशाळा कर्मचारी ५२ असे एकूण ३९५ कर्मचारी कार्यरत आहेत. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सुंदर बसस्थानक, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुखसुविधा व उत्पन्नवाढीसाठी नियोजन केले.शिवाय चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय सहकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे व कामामुळे चोपडा आगाराने राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला. यांचे सर्व श्रेय चोपडा आगारातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना जाते, असे आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने