सन्मानचिन्ह म्हणजे आयुष्य योग्य मार्गाने जगण्याची प्रेरणा - गनी मेनन; चोपडा येथे रोटरी व्होकेशनल अवॉर्ड वितरण समारंभ

 सन्मानचिन्ह म्हणजे आयुष्य योग्य मार्गाने जगण्याची प्रेरणा - गनी मेनन; चोपडा येथे रोटरी व्होकेशनल अवॉर्ड वितरण समारंभ 

चोपडा दि.२४(प्रतिनिधी)- संपत्ती, पद, प्रतिष्ठा, ज्ञानाचे प्रदर्शन वाढले की माणसाचा मूर्खपणा आणि घमंडीपणा वाढतो. जीवनात समाधानी असण्यासाठी पैसा, पद, सत्ता नव्हे तर मनात पवित्र सेवाभाव असावा लागतो. कारण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचे असते. समाजाच्या मनात घर करण्यासाठी मन मोठे असावे लागते, मनात सेवाभाव असावा लागतो आणि स्वच्छ मन असावे लागते. कुणीतरी आपल्या कामात कुचराई करतो म्हणून सेवाभावी काम करणाऱ्यांची समाजाला गरज आहे. म्हणूनच रोटरीचा पुरस्कार मिळालेल्यांच्या जबाबदारीत आता वाढ झाली आहे. पुरस्कार किंवा स्मृतिचिन्ह ही फक्त एक वस्तू नसून पुढील आयुष्य योग्य मार्गाने जगण्याची प्रेरणा असते, असे रोटरी व्होकेशनल अवॉर्ड प्राप्त पुरस्कारारार्थींचे अभिनंदन करतांना रोटे. गनी मेनन (जळगाव) यांनी सांगितले.

येथील आनंदराज पॅलेस येथे रोटरी क्लब ऑफ चोपडा आयोजित चार्टर डे आणि व्होकेशनल अवॉर्ड वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर रोटे. रमण जाजू (जळगाव), रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे.चेतन टाटीया, सचिव रोटे.अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे.प्रदीप पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन टाटीया यांनी तर सूत्रसंचालन गौरव महाले यांनी व आभार प्रदर्शन अर्पित अग्रवाल यांनी केले. यावेळी विलेश सोनवणे, राज मोहम्मद शिकलगार, रमण जाजू यांनी मनोगते व्यक्त केले.

या समारंभात विलेश सोनवणे (पोलीस दल), राज मोहम्मद शिकलगार (कॅन्सरग्रस्तांची सेवा), अमृत शंकर पारधी (शाळा सेवक), मीराबाई दगडू बाविस्कर (वरिष्ठ सफाई कर्मचारी), नीता शरद कंखरे (एसटी वाहक), मनीषा राजेश बारी (वैद्यकीय सहाय्यक), संगीता पंडित पाटील (आशा सेविका), सुशीलाबाई दत्तात्रय सोनार (वैद्यकीय सेवा), अविनाश राजेंद्र पाटील (वायरमन) यांचा व्होकेशनल अवॉर्ड देऊन रोटे. गनी मेनन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रोटरी सदस्य रोटे. विलास पी. पाटील, संजय बारी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. समारंभास पुरस्कारार्थी तसेच रोटरी सदस्यांचे परिवारजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने