अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरची प्रांताधिकाऱ्यांचा गाडीवर चढाई..चोपडा उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे जखमी होऊन बालंबाल बचावले ..ट्रॅक्टर चालकासह मालकांवर गुन्हा

 अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरची प्रांताधिकाऱ्यांचा गाडीवर चढाई..चोपडा उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे जखमी होऊन बालंबाल बचावले ..ट्रॅक्टर चालकासह मालकांवर गुन्हा

चोपडा दि.१९(प्रतिनिधी ) : चोपडा तालुक्यातील खडगाव नजीक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा सिनेमा स्टाईल पाठलाग करीत पकडण्याचा प्रयत्नांत असलेल्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला उलटपक्षी धडक देत प्रांताधिकारींना जखमी करणाऱ्या मुजोर ट्रॅक्टरचालकासह मालकांवर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून  अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी वाढली असून  अधिकाऱ्यांच्या जीवांवर बेतण्याची घटना वाढीस लागल्याने वेळीच आळा बसने गरजेचे असल्याचे सर्व सामान्य जनतेतून बोलले जात आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी,   प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय भंगाळे हे आपल्या स्वतः च्या खाजगी वाहनाने (MH 20 FY 0216) पत्नी आणि मुलगी यांचेसह जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयातील  मीटिंग आटोपून दुपारी 3.30 वाजता चोपडा  येथे परत येत होते. तेंव्हा खडगाव  येथून जात असताना त्यांच्या निदर्शनास आले कीअवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक वाळू भरलेल्या ट्रॉलीसह जात आहे, तेव्हा त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग वाहऱ्या पावरा यांना वाहन पकडण्याचे  सांगितले त्यानुसार त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा   पाठलाग करीत  ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर थांबविण्याचे सांगितले असता ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे याने ट्रॅक्टर थांबवले नाही. उलट तलाठी गुलाबसिंग पावरा यांना शिवीगाळ करून तू साईडला झाला नाही तर तुला उडवून देईन अशी धमकी देऊन ट्रॅक्टर पळून नेण्याचा इराद्यात असतांना  प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय बंगाळे यांनी त्यांच्या खाजगी वाहनाचा वेग वाढवून सदरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक  त्यांचे खाजगी वाहन ट्रॅक्टर पुढे उभे केले तितक्यात तलाठी गुलाबसिंग पावरा यांनीही मोटरसायकल  ट्रॅक्टरच्या पुढे  उभी केली असता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने राजेश विकास मालवे (वय 23 रा. खरग तालुका चोपडा) याने प्रातांधिकारींच्या वाहनाला  धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्यात प्रांताधिकारी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला जबर दुखापत झाली असून  बालंबाल बचावले असून वाहनाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. 

 याप्रकरणी प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय बंगाळे (वय 32) यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अवैध वाळू  वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक व मालक पूर्ण नाव माहिती नाही यांच्या विरोधात कलम 353, 332, 379, 504, 506, 427 व महसूल अधिनियम कलम 48 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकास चोपडा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते. महसूल कार्यालयातील तहसीलदार भाऊसाहेब थोरात व नायब तहसीलदार सचिन बांबोडे व इतर कर्मचारी गुन्हा दाखल करतेवेळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने