स्वा.सै.मोहनलाल छोटालाल गुजराथी शताब्दीला प्रारंभ

 स्वा.सै.मोहनलाल छोटालाल गुजराथी शताब्दीला प्रारंभ

चोपडा दि.१८(प्रतिनिधी)- येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि प्रख्यात गुळाचे व्यापारी मोहनलाल छोटालाल गुजराथी यांच्या जन्मशताब्दीला आजच्या गुजराथी वाडीतील छोटेखानी कौटुंबिक सोहळ्यातून प्रारंभ होत आहे.

स्वा.सै.मोहनलाल गुजराथी यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२४ ला सामाजिक व देशप्रेमाने ओतप्रोत कुटुंबात झाला.स्वातंत्र्यकाळात तात्कालीन अनेक नेत्यांचा राबता गुजराथी गल्लीत असल्याने साहजिकच बालपणींच भारत स्वतंत्र होण्यासाठी लढण्याचे बाळकडू त्यांना प्राप्त झाले होते.

या मंतरलेल्या दिवसात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत १९४२ च्या चले जाव चळवळीत सहभाग घेतला.पु.साने गुरुजी चोपडा येथे आले असतांना इंग्रज सरकारने त्यांना दिसता क्षणी पकडण्याचे आदेश काढले होते.त्यामुळे साने गुरुजी चोपड्यातच भुमीगत झाले.त्यांना चोरवाटेने अमळनेरला सोडायला जातांना अॅागस्ट १९४२ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना अटक करण्यात आली.त्यांना धुळे कारागृहात सहा महिने अटकेत ठेवण्यात आले होते.

मोहनलाल गुजराथी यांना त्यांचे स्व. छोटालाल वेडूसा गुजराथी यांच्याकडून व आई स्व.गोपीबाई यांचेकडून देशप्रेमाचा वारसा प्राप्त झाला होता.त्यांच्या वडीलांना स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज सरकार विरुध्द अंदोलन केल्याने सहा महिन्याचा कारावास १९३० ला झाला होता. तसेच स्व. गोपीबाई गुजराथी ह्यांनी चोपडा तहसील कचेरीवर तिरंगा ध्वज फडकाविल्याने १९४२ च्या चळवळीत धुळे कारागृहात अटकेत होत्या.

स्वा.सै.गुजराथी यांनी फैजपूरच्या कॅाग्रेस अधिवेशनात योगदान देत वेगवेगळ्या प्रकारचे दायित्व पार पाडले.तसेच चोपड्यात व्यापारात नावलौकिक प्राप्त केला होता.नुकत्याच पार पडलेल्या देशाच्या अमृत महोत्सव प्रसंगी त्यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला होता.

आजही स्वातंत्र्य चळवळीबद्दल भरभरुन बोलतात.देशाच्या सर्वांगिण स्थितीवर परखड मतही व्यक्त करतात.त्यांच्या शताब्दी सोहळ्याला छोटेखानी कार्यक्रमाने प्रारंभ होत आहे.आजही दिवंगत दोन्ही मुलांच्या पश्चात तसेच दोन्ही मुलींच्या गोतावळ्यात प्रकर्षाने गुंतून जातात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने