*बागल महाविद्यालयात ताण-तणाव मुक्त परीक्षा अभियान*
दोंडाईचा दि.२०(प्रतिनिधी) येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे श्रीमती पा. बा. बागल कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे ताण-तणाव मुक्त परीक्षा अभियान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार तर प्रमुख मार्गदर्शक नूतन माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी.पाटील होते.
डॉ. बी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजचा विद्यार्थी परीक्षेच्या काळात सर्वात जास्त तणाव असतो. ज्याप्रमाणे आपण एखादा चित्रपट किंवा मालीका पाहतो व त्याची कथा पाठ करतो किंवा त्यातील पात्रांचे भवितव्य व्यक्त करतो त्याप्रमाणे अभ्यासक्रम व पुस्तकातील वाचलेल लक्षात राहू शकते. त्याचं सातत्याने वाचन, चिंतन व मनन केले तर परीक्षेत समर्पक उत्तरे लेखन सोपे जाते. अभ्यासासोबत घरातील वातावरण, योगासन, ६ ते ८ तास पुरेशी झोप या गोष्टी तणाव कमी करण्यास मदत करतात. परीक्षेत गैरप्रकार करून पास झालेला विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. कमी मार्काने पास झालेले व उच्च पदापर्यंत पोहोचलेल्या अनेक मध्यम व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उद्बोधन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लोहार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपली सतत धडपड सुरू असते व वेगवेगळ्या टप्प्यावर विविध परीक्षांना सामोरे जात असतो. अभ्यासाचे नियोजन, स्वतः नोट्स काढण्याची सवय, वेळेचा सदुपयोग, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव यासोबतच ताण-तणाव वाढवणाऱ्या ईंटरनेट व मोबाईल, टीव्ही वरील मालिका, सिनेमा पाहणे, लक्ष विचलित करणाऱ्या कट्ट्यावरील सामूहिक चर्चा यासारख्या गोष्टींवर स्वतःहून बंधने घातली तर परीक्षेत निश्चितच यश प्राप्त होते. स्वकष्टाने मिळवलेले यश हे चिरकाल टिकणारे व प्रगतीपथावर नेणारे असते. योग्य विषयांसह परीक्षा फॉर्म भरणे, हॉल तिकिट तपासून घेणे, परीक्षेचे वेळापत्रक लिहून घेणे त्यानुसार तयारी करणे इत्यादी गोष्टींसह शारीरिक, मानसिक व बौद्धिक रित्या जोमाने सकारात्मक उर्जेसह परीक्षेला येताना व उत्तरपत्रिका लिहिताना सजग रहावे इत्यादी सूचना देऊन व येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. रणजित आठवले यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन व आभार प्रदर्शन प्रा. आर.आर.माळीच यांनी मानला. या कार्यक्रमाला असंख्य विद्यार्थ्यांसह प्रा. विश्वास जे. पाटील, प्रा. आर. जी. सुर्यवंशी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले.
