सातपुड्यात वन्यजीव सप्ताह व जागतिक अस्वल दिन साजरा

 *सातपुड्यात वन्यजीव सप्ताह व जागतिक अस्वल दिन साजरा

 ♦️अस्वल अधिवास क्षेत्रात सहजीवन व संवर्धनासाठी.. सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे आवाहन..

चोपडा दि.२०(प्रतिनिधी)- तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतराजीत राखीव वनक्षेत्रात व लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वनक्षेत्रातील सस्तन प्राण्यांच्या संवर्धनासाठी येथील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे वन्यजीव सप्ताह व  जागतिक अस्वल दिनानिमित्त शेवरे बुद्रुक या ठिकाणी अस्वल व मानव सहजीवन प्रबोधन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

गेल्या वर्षी शुष्क ऋतूत राखीव वन क्षेत्रात गुरचराईसाठी गेलेल्या तीन व्यक्तींवर वेगवेगळ्या घटनेत अचानक समोर गेल्याने अस्वलाने स्वबचाव आणि पिलांच्या रक्षणार्थ त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला होता. पैकी 

बिसना बारेला नामक इसम मृत्युमुखी पडला तर दोन व्यक्ती गंभीर घायाळ झाले होते. या पार्श्वभूमीवर अस्वल अधिवास क्षेत्रात वावरताना व रहिवास असताना अस्वलापासून सावधानता कशी बाळगावी , ऐनवेळी बचाव कसा करावा व सहजीवन कसे स्वीकारावे यासंबंधी येथील वन्यजीव अभ्यासक श्री हेमराज पाटील यांनी आशिया खंडातील अस्वलांसाठी पहिल्या राखीव  दारोजी राष्ट्रीय अभयारण्यातील घडलेल्या सत्य घटनांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या कथा आणि संशोधन अभ्यासाच्या आधारावर उपस्थित वनवासी बांधवांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी आर्यदीप पाटील याने काही कृती प्रात्यक्षिके करून दाखविलीत. अस्वलाची दिनचर्या , वर्तन , खाद्य , सवयी , प्रजनन कालावधी , हल्ला करण्याची पद्धत , हल्ल्यापासून बचाव कसा करावा यावर भाष्य केले.

भारतात 1952 पासून साजरा होणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचा मुख्य उद्देश वन्यजीव संरक्षण व संवर्धन असून हा हेतू यशस्वी होण्यासाठी , उपस्थितांना कुठेही शिकार होणार नाही म्हणून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चा कायद्याची ओळख व माहिती देण्यात आली. आपल्या अस्तित्वासाठी लढत असलेल्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

विविध वन्य जीव भ्रमण मार्गाजवळील शेवरे पाडा,धुपेमाय , नूर वस्ती , वरगव्हाण येथील नागरिकात शून्य सर्पदंश , मानव बिबट संघर्ष टाळणे , अस्वल अधिवास क्षेत्रात घ्यावयाची काळजी , वन्यजीव शिकार प्रतिबंध अधीनियम इ .विषयी मार्गदर्शन करणारे चारशे पत्रकांचे वाटप करण्यात आले

यासाठी सहाय्यक वनसंरक्षक श्री प्रथमेश हाडपे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सदस्य अश्विनी पाटील , घनश्याम वैद्य , अश्फाक पिंजारी , आर्यदीप पाटील ,पोलीस पाटील गणदास बारेला , प्रताप बारेला , रमेश बारेला , भावलाल बारेला , मिमाबाई बारेला यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने