पोळ्यावर महागाईची मारबत..जगाचा पोशिंदा "सर्जाराजा" शिंगे नगो तासू रे ..!

 पोळ्यावर महागाईची मारबत..जगाचा पोशिंदा "सर्जाराजा" शिंगे  नगो तासू रे बाबा..!

       


   आज पोळा..!शेतक-यांच्या आनंदाचा दिवस.शेतक-यांचाच नाही तर बैलांच्याही आनंदाचा दिवस.त्यानिमीत्ताने लोक बैलाची पुजा करतात.त्याला एक दिवस का होईना आराम देतात.आदल्या दिवशी खोर भरो,कोटा वाढो म्हणतात.तर बैलाचे खांदे शेकतांना आज आवतन घे,उद्या जेवायला ये म्हणतात.

        आज जसे बैलं पुजतात,तसेच बैल उद्याही पुजले जातील,कालही पुजत होते.पण आज बैलाची संख्या कमी झाली आहे.त्या बैलाची जागा न परवडणारा ट्रँक्टर घेवू पाहात आहे.पण महत्वाचे म्हणजे जी कामे बैलं करु शकतात.ती कामे ट्रँक्टर करु शकत नाही.

       काल जेव्हा बैलपोळा साजरा व्हायचा.तेव्हा शेतकरी या बैलासाठी खास बोरुच्या तागाचे दोर बनवायचे.चौ-या मटाटेही याच तागाचे बनवायचे.त्या तागाला रंग द्यायचे.गेरुचा रंग बनवायचे.तसेच चिक्कीनं बेगड लावायचे.मात्र बैलाला वेदना देत त्याची शिंग तासत नसत.

         आज मात्र या बैलाला ऐन बैलपोळ्याच्या दिवशी त्रास दिला जातो.आज बैलाची शिंगे तासली जातात.त्या शिंगाला जास्त शिलल्याने कधीकधी बैलाला रक्त लागतं.तिथं जखम होते.ती जखम पुढं एवढी चिघळते की त्यात बैलाला मृत्यूही संभवतो.

       शिंग तासणे ही एक पद्धत जरी वाईट असली तरी आज प्रत्येक शेतकरी बैलाची शिंग तासतात.नव्हे तर जास्तीतजास्त पैसे मिळावे म्हणून बैलाला पोळा फुटल्यावर धावत धावत घरी नेल्यासाठी पराण्या टोचतात.मारतातही.तेव्हा विचार येतो की हाच का बैलपोळा! बैलाच्या आनंदाचा क्षण की दुःखाचा क्षण! जिथे बैलाला पुरणपोळी पुरविण्याऐवजी त्या बैलाचा आधार घेवून पैसे कमविण्याचा गोरखधंदा आज सुरु आहे.नव्हे तर या बैलाला घरोघरी फिरवून आलेल्या पैशातून जुव्वा खेळून दारु पिवून झिंगत पडणारे महाभाग आज आहेत.

          बैलपोळ्याला जसा बैलाला त्रास होतो,तसाच त्रास त्या झाडांनाही होतो.या दिवशी शेकडो पळसाच्या झाडाची हत्या केली जाते.मेढ्या म्हणून लावतांना शेकडो पळसाची झाडे गारद होतात व पर्यावरण संतुलन बिघडते.नव्हे तर दुस-या दिवशी श्रावण महिना संपला म्हणून बकरा कोंबडा यासारख्या प्राण्यांचीही हत्या केली जाते.बकराबाजारात आजही रक्ताचे पाट वाहतील अशी स्थिती असते.एवढी भयानक वास्तवता.खरंच बैलपोळा बैलाच्याही आनंदाचा नाही.प्राणीमात्राच्याही आनंदाचा नाही तसेच वृक्षांच्याही आनंदाचा नाही असे वाटायला लागते.

         आज मात्र या बैलपोळ्याने महागाईची जागा घेतलेली आहे.काल खास शेतकरीवर्ग बैलासाठी बोरुच्या तागाचे दोर विणत होता.आज तो दोर विणतांना दिसत नाही.काल बेगडावर काम भागवत होता.आज मात्र शिंगांना पेंट केला जातो.काल नाला ठोकत नव्हते.आज बैलाला नाल ठोकली जाते.

         बैलाला सजविण्यात येणारे रंग,चौ-या मटाटे,बाशिंग अति महाग झाले असून शेतकरी वर्गाला परवडणारी गोष्ट नाही.आताच्या शेतक-यांसमोर आजच्या दिवसाची सांज कशी भागवायची असा विचार असतो.त्यातच आजचा शेतकरी आत्महत्या ही करतो अशावेळी बैलपोळा साजरा करतांना महागाई जर असा नाच दाखवत असेल तर शेतक-याने बैलपोळा हा सण कसा साजरा करावा.बाजारात महागाईने उसळी घ्यावी.त्या गोष्टीला मनाई नाही.पण निदान बैलासाठी तरी या महागाईने उसळी घेवू नये.जेणेकरून उद्या हा बैलपोळाच सण बंद करावा लागेल.तसेच आपणही बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलाची काळजी घ्यावी.निदान त्यांना या दिवशी तरी मारु नये.दारोदारी फिरवावे.बैलालाही पुरणपोळी खायला घालावी.पण याचा अर्थ पाहिजे तेवढीच.त्याचा त्रास बैलाला होणार नाही.याची काळजी आपण घेतलेली बरी.

          पोळ्यावर महागाईची मारबत येवू देवू नये.जरी दुकानातल्या वस्तू महाग झाल्या असतील,तरी शेतक-याने पुर्वीसारखे आज बोरुपासून ताग काढावा.दोरखंड बनवावे.नव्हे तर त्या तागापासूनच चौरं व मटाट्या बनवाव्या.जेणेकरून बौलपोळा साजरा करतांना महागाईची ही मारबत त्रास देणार नाही.

    अंकुश शिंगाडे (९३७३३५९४५०)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने