स्टेट जीएसटी चे असिस्टंट कमिशनरांची प्रापर्टीची चौकशी करा.. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
चोपडा, दि.१९(प्रतिनिधी ):जळगाव जिल्ह्यातील स्टेट जीएसटी चे असिस्टंट कमिशनर यांनी कोट्यावधी रुपयांचा खंडण्या घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी केला असून या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ईडीचे मुख्य संचालक अँटी करप्शन महाराष्ट्र राज्याचे कमिशनर यांच्याकडे तक्रार दिली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार,जळगाव ,धुळे ,नंदुरबार या तीनही जिल्ह्यात स्टेट जीएसटी चे असिस्टंट कमिशनर मेहुल संजय कुमार इंदानी व त्यांच्या पथकाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. मध्यमवर्गीय व लहान व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात असून माया उकळली जात आहे या प्रकाराने तिन्ही जिल्ह्यामध्ये व्यापाऱी वर्ग मेटाकुटीला आला आहे . असा त्रासदायी प्रतापी अधिकारी जळगाव जिल्ह्यात कधीही पाहायला मिळाला नसल्याचे टॅक्स कन्सल्टंट व व्यापाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे. या संदर्भात ईडीने व लाचलुचपत विभाग मुंबई ,सीबीआय दिल्ली, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दखल घेऊन सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणल्यास आतापर्यंत अनधिकृत जमविलेला कोट्यावधीचा मलिदा बाहेर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजमितीस सर्वच व्यापारी वर्ग पार धास्तावला असून व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे तरी ताबडतोब या अधिकाऱ्यांची वरीष्ठ पातळीवर चौकशी करून कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत राज सचदेव यांनी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.