चौगाव किल्ल्यावर रोज शेकडो पर्यटक घेताहेत निसर्गाचा आनंद
चोपडा, दि.५(प्रतिनीधी )-जळगाव जिल्ह्यातील दुर्ग प्रकारापैकी एकमेव सुस्थीतीत असणारा सातपुड्यातील चौगावचा किल्ला म्हणजे निसर्ग सौंदर्याचा ठेवाच म्हणावा लागेल. चोपड्यापासून अवघ्या बारा कि.मी.वर व चौगाव पासून तीन कि.मी.वरील चौगावचा किल्ला हा निसर्ग व दुर्ग प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरत आहे.सातपुड्याच्या पहील्याच रांगेत व निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेल्या डोंगरात वसलेला हा किल्ला सध्या पर्यटकांचे मन वेधून घेत आहे.चौगाव पासूनच जंगलातून जाणारा रस्ता,दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडे,झुरझुळ वाहाणारे नाले ,विविध आवाज काढून पर्यटकांचे स्वागत करणारे पक्षी ,मध्येच कुठेतरी क्वचितच हरीण,निलगाई,तडस,मोर यांचे दर्शन यामुळे मन अगदी भारावून जाते.गावापासून तीन कि.मी.वर असणारा तिन नाल्यांचा संगम म्हणजे त्रिवेणी संगम तेथेच असणारे पुरातन महादेव मंदिर व पर्यटकांना बसण्यासाठी असलेले पत्री शेड व सिमेंट आसन व हातपंपावर पिण्यासाठी शुद्ध पाणी आहे.पोहण्यासाठी बांध आहेत.त्रिवेणी संगमाच्या अलिकडेच वाहण लावून पुढचा किल्ला व धबधब्यापर्यंत वळन मार्गाने करावा लागणारा पायी प्रवास.किल्ल्यावर चढल्यावर तेथून दिसणारा सातपुडा परीसर म्हणजे जणू स्वर्गच.किल्ल्यावर असणार्या शालीवाहन कालिन लेण्या ज्यांना स्थानिक लोकं टाक्या म्हणतात.आजही सुस्थीतीत उभे असलेले दरवाजे,सप्ततलावांचा समुह,राजप्रसादालय,बुरूज,भुयारी मार्ग हे बाराव्या शतकातील साक्ष देतात.तसेच किल्ल्याच्या बाजूलाच असलेला उंच धबधबा पर्यटकांना आकर्षीत करतो.धबधबा हा घनदाट झाडांच्या मध्ये आहे.तिथे गेल्यावर पर्यटकांना आंघोळीचा मोह आवरला जात नाही.पण पाऊस चालू असल्यास धबधब्याखाली आंघोळीला कुणी जाऊ नये.अशा ह्या निसर्गमय वातावरणात दररोज शेकडो पर्यटकांची वर्दळ असते.
पण दुर्दैव ह्या किल्ल्याची पुरातन विभागाला अजूनही नोंद नाही,त्रिवेणी मंदिरापर्यंत चारचाकी व दोन चाकी वाहण जात असली तरी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता,अल्पोआहाराची सोय,पर्यटकांसाठी निवारा किंवा विश्रामग्रुह व लाईट ह्या अत्यावश्यक सेवा नसल्याने येथे मुक्कामी राहाता येत नाही.