रक्कम अर्धा टक्का.. लेखापालाला दे धक्का..! यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयात २० हजार घेतांना रंगेहाथ
चोपडा दि.२६(प्रतिनिधी) भोजन पुरवठादाचे बिल मंजूर झाल्यानंतर त्यापोटी मोबदला म्हणून तडजोडीअंती 20 हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लेखापालास जळगाव एसबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी चार चाजेच्या सुमारास आदिवासी प्रकल्प कार्यालयातच करण्यात आली. रवींद्र भाऊराव जोशी ( 57, रा. नेहरू नगर, मोहाडी रोड, जळगाव) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. या कारवाईने आदिवासी प्रकल्प विभागातील लाचखोर हादरले आहेत.
मे. सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, दहिवद या संस्थेच्या माध्यमातून चोपडा येथील नवीन आदिवासी मुलांचे वस्तीगृहाला 2021-2022 या शैक्षणिक वर्षात वस्तीगृहात लागणारा दैनंदीन भोजनाचा ठेका घेतला. वर्षभर या वस्तीगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्यापोटी 73 लाखांचे बिल डीडीद्वारे शासनाकडून अदा करण्यात आले मात्र काम करून देण्यात आल्याच्या मोबदल्यात एकूण बिलाच्या अर्धा टक्के अर्थात 36 हजार 500 रुपये आरोपी रवींद्र जोशी याने तक्रारदाराकडे शुक्रवार, 26 रोजी मागितले होते. तक्रारदाराने याबाबत जोशी यांच्याशी तडजोड करीत 20 हजार रुपये देण्याचे कबुल करीत लाचेमागणीची तक्रार नोंदवली. दुपारी चार वाजेच्या सुमारास
यावल एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल कार्यालयातील स्वतःच्या दालनात जोशी यास लाच स्वीकारताच पकडण्यात आले. या प्रकरणी संशयिताविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल आला.
हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, निरीक्षक संजोग बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सचिन चाटे, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, महिला हवालदार शैला धनगर, नाईक जनार्दन चौधरी, पोलीस नाईक किशोर महाजन, पोलीस नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.