कोळी समाज बांधवांचे आंदोलनाकडे प्रशासनाचे दूर्लक्ष.. निद्रिस्तांना जागविण्यासाठी विशाल बाईक रॅली
*चोपडा दि.१०( प्रतिनिधी) वर्षानु वर्षे आदिवासी टोकरे कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी होत असलेल्या अन्यायाला कंटाळून समाज बांधवांनी अमळनेर प्रांत कार्यालयावर अन्न त्याग सत्याग्रहाचे हत्यार उपसले आहे तीन दिवस होऊन प्रशासकीय यंत्रणा निद्रा अवस्थेत असल्याने त्यांना जागविण्यासाठी मोटार सायकल रॅलीने हॉर्न वाजवत उठवविण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला असून ताबडतोब समाजाचा प्रश्न सोडवावा अन्यथा पुन्हा " वाल्मिकीचा वाल्या करू नका "असा आवाज संतप्त तरुणांतून निनादला . आदिवासी समाजात कोणत्याही समाजाला असा त्रास होत नसून कोळी समाजावरच असा अन्याय का होतो ?असा परखड सवाल करत आता सहनशीलतेच्या पलिकडे हा जात प्रमाण पत्राचा विषय गेला आहे . प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब न्याय द्यावा अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील असा इशाराही तरुणांनी दिला आहे.*
आज दि.१० मे रोजी आदिवासी टोकरे कोळी जमाती तर्फे अमळनेर येथे सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला समर्थन म्हणून मोठ्या संख्येने बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले. बाईक रॅली ला चोपडा व अमळनेर तालुक्यातील खेड्यापाड्यातील बांधवानी सहभाग दिला. आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या संविधानिक हक्क मागणी संदर्भात दि. 8 मे 2023 पासून प्रांत कार्यालय अमळनेर समोर अन्नत्याग सत्याग्रहाचा नारा श्री.जगन्नाथ बापू बाविस्कर यांच्या तर्फे पुकारण्यात आला आहे.
त्या उपोषणाला समर्थन म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक व युवा संघटक श्री.शुभम सोनवणे, ऍड. गणेश सोनवणे व समाजाचे सर्व सन्माननीय जमात बांधव यांच्या वतीने प्रांत कार्यालयाला कायदेशीर बाजू मांडण्याकरिता निवेदन अर्ज टपाल विभागात दाखल करण्यात आला. तसेच सदर निवेदन अर्जाच्या प्रति मा.विभागीय आयुक्त, नाशिक, मा.राज्य लोकसेवा हक्क आयुक्त नाशिक, मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालयाला प्रति दाखल करणार असल्याचे कळविले. तालुक्यातुन बाईक रॅली ला खूप प्रतिसाद मिळाला व आद्यकवी महर्षी वाल्मिकींचा व भारतीय संविधानाचा जयघोष करत रॅली अमळनेर शहरात उपोषण स्थळी पोहोचली. निद्रिस्त प्रशासनाला जागविण्यासाठी ही रॅली प्रांताधिकारी कार्यालयांवर धडकताच संतप्त तरुणांनी न्यायासाठी घोषणाबाजी केली.व कोळी समाजालाच जात प्रमाण विषयी सापत्न वागणूक का? असा परखड सवाल करत आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिला.