चोपड्यात 'सांज पाडवा - सुश्राव्य गीतांची मैफल' संपन्न
चोपडा दि.२३(प्रतिनिधी):- येथील शिवरंजनी संगीत विद्यालयाच्या शाखा उद्घाटनानिमित्त व नूतन मराठी वर्षारंभाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखा व शिवरंजनी संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुढी पाडव्यानिमित्त 'सांज पाडवा' या सुश्राव्य गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २२ रोजी रात्री ८.३० वाजता पंकज विद्यालय, पंकज नगर येथे आयोजित या संगीत मैफलीत दूरदर्शनवरील 'ताक धी ना धिन' या संगीत स्पर्धेच्या प्रथम फेरीचे विजेता सुप्रसिद्ध गायक नागेश अंबादास खोडवे (संभाजीनगर) यांच्यासह चोपडा येथील शिवरंजनी संगीत विद्यालयाचे मनोज चित्रकथी यांनी मराठी भजने, गीते ,भावगीते, नाट्यगीत, गज़ल यांचा सुश्राव्य स्वराविष्कार सादर केला. 'येई ओ विठ्ठले....' या भजनाने नागेश खोडवे यांनी या मैफलीचा आरंभ केला. 'कृपा करा माई ...., रंध्रात पेरली मी...' या भजनांसह 'येथुनी आनंदु रे..., बगळ्यांची माळ फुले ...' ही भावगीते व 'काटा रुते कुणाला...' हे नाट्यगीत त्यांनी सुरेल आवाजात सादर केले. त्यांनी सादर केलेल्या 'कधी तो चंद्रही माझ्या घराशी...., वेगवेगळी फुले उमलली..., चंद्र आता मावळाया लागला...., जगणे कळाया लागले आता ..., अंदाज आरशाचा वाटे खरा असावा....' या गजला रसिक श्रोत्यांना भावल्या. या मैफलीत मनोज चित्रकथी यांनी 'नाही पुण्याची मोजणी...., स्वयें श्री राम प्रभू ऐकती...' या भजनांसह 'मान वेडावूनी धुंद होऊ नको..., आकाशी झेप घे रे पाखरा...' ही भावगीते सादर करुन रसिकांची मने जिंकली.
तर नागेश खोडवे यांनी 'उघड्या पुन्हा जाहल्या जखमा...' या भैरवीने मैफलीची सांगता केली. या मैफलीत योगेश संदानशिव (अमळनेर), नरेंद्र भावे (चोपडा) यांनी तबल्यावर तसेच योगेश चौधरी यांनी साथसंगत केली. आकाशवाणी कलावंत गिरीश चौक (अमळनेर) यांनी निवेदन केले.
आरंभी शाखेचे उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, कार्यवाह संजय बारी, विश्वस्त मंडळाचे कार्यवाह श्रीकांत नेवे, डॉ. विकास हरताळकर, पंकज बोरोले यांच्यासह मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून मैफलीचे उद्घाटन केले. योगेश चौधरी यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
या संगीत मैफलीस रसिक श्रोत्यांनी उपस्थिती मोठ्या संख्येने होती.