आईचा खून..! गलंगीतील सावत्र मुलाकडून थरार..
चोपडा दि.२६ (प्रतिनिधी): तालुक्यातील गलंगी येथील 45 वर्षीय महिलेचा डोक्यात लाकडी दांडा मारून मुलानेच खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सहाबाई शिवराम बारेला (45, गलंगी, ता.चोपडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर हा खून संशयीत आरोपी दीपक मगन बारेला (25) याने केल्याचा आरोप असून त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, दीपक बारेला यांची सहाबाई बारेला ही सावत्र आई असून ती मुलाला वागणूक व्यवस्थित देत नसल्याने या प्रकाराला दीपक वैतागला होता. रविवारी रात्री उभयंतांमध्ये याच कारणावरून वाद झाला व संतप्त मुलाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
चोपडा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत नेमका प्रकार जाणून घेतला. संशयीत तरुणाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.