श्रावणातील पहिला सण नागपंचमी*



*श्रावणातील पहिला सण नागपंचमी*

आपल्या देशात सणांना खूप महत्त्व आहे, त्यातील श्रावणातील पहिला व महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी.नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून प्रसन्न करणे हे फार वर्षापासून चालू आहे, नागपंचमी करण्यामागे खूप जुन्या कथा सांगितल्या जातात, त्यात काही पुराणातील तर काही दंतकथा ही आहेत.

पुराणातील कथेप्रमाणे तक्षक नागाच्या अपराधाला सजा देण्यासाठी राजा जनमेनजयानं सर्पयज्ञ सुरू केला, त्याने सर्व सापांची आहुती देणे चालू केलं ,तेव्हा तक्षक नाग आपला जीव वाचविण्यासाठी इंद्राच्या आश्रयाला गेला,अपराध्याला अभय देणे हा सुद्धा अपराध आहे म्हणून जनमेनजय राजाने इंद्राची आहुती दिली, तेव्हा अगस्त ऋषी ने तप करून जनमेनजयाला प्रसन्न केले,इच्छित वर माग असे सांगितलेल्यावर सर्पयज्ञ थांबवावा अशी विनंती केली, राजाने यज्ञ थांबवला आणि तक्षकाचे प्राण वाचले, तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा.

           दुसरी कथा आहे द्वापारयुगातील श्रीकृष्णाने यमुना नदीच्या डोहात कालिया मर्दन केले, तो शरण आला तेव्हा त्याला कोणत्याही प्राण्याला इजा न करण्याचे वचन घेऊन अभयदान दिले  तोही दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी, म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण साजरा होतो, साप सुद्धा या दिवशी कोणालाही इजा करत नाही .

दंतकथेप्रमाणे फार वर्षापूर्वी एका गावात एक शेतकरी आपल्या दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी सोबत राहत होता. एकदा शेतकरी शेतात नांगरत असताना नांगराच्या फालात नागिनीची तीन पिल्लं मरतात ,क्रोधीत होऊन नागिन बदला घेण्यासाठी रात्री अंधारात शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांना दंश करून मारते,सकाळी परत येऊन  मुलीला चावणार इतक्यात ती मुलगी दुधाची वाटी नागिनी समोर ठेवून माफी मागते, मुलीची श्रद्धा पाहुन नागिन प्रसन्न होऊन तिला अभयदान देते आणि तिच्या दोन्ही भावांना परत जिवंत करते, हा पण दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा, म्हणून नागपंचमीला नागाला दुध दिले जाते. खरंतर नाग दुध पीत नाही,नागाच्या शरीररचनेनुसार नागाच्या पोटात  दुध गेलं तर नाग अशक्त होऊन मरुन जातो, म्हणून नागाला दुध पाजू नये.

सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करुन नागपंचमीच्या दिवशी गारुड्यांना बंदी घातली आहे .

    सर्वात जुनी कथा आहे सत्वेश्वरी देवीची. पाच युगांपूर्वी सत्वेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती, एकदा तिचा भाऊ सत्वेश्वर याला नागपंचमीच्या आदल्या दिवशी सर्पदंश होऊन मृत्यू आला. त्यामुळे भावाच्या शोकात  सत्वेश्वरीने दिवसभर अन्नग्रहण केले नाही तिला उपवास घडला म्हणून स्त्रिया भावाच्या उदंड आयुष्यासाठी उपवास करून देव व नागदेवातेला साकडे घालतात .

सत्वेश्वरीला दृष्टान्त झाला की तिचा भाऊ नागजन्मात गेला आहे. ती जंगलात सैरावैरा फिरत भावाला शोधू लागली ,कुठेही दिसेना म्हणून उंच झाडावर चढून शोधू लागली, तिची ती अवस्था बघून नागरुपात भावाने तिला तिथेच  दर्शन दिले,

त्यामुळे त्याच नागाला तिने भाऊ मानले व आनंदानं झाडाच्या फांद्याना झोके घेऊ लागली, आजपर्यंत स्त्रिया त्याचमुळे या दिवशी नागाला भाऊ मानून त्याची पुजा करतात, व त्या दिवशी झाडाला झोके घेतात .

सत्वेश्वरी भावाच्या दुःखात निस्तेज झाली होती, तिला आनंदी करण्यासाठी नागाने वस्त्रे व अलंकार दिले, म्हणून या दिवशी स्त्रिया नवीन कपडे व अलंकार घालतात . तो आता परत जाऊ नये असे वचन तिने मागितले तेव्हा नागाने आपला फणा तिच्या हातावर ठेवून वचन दिले, तेव्हा तिच्या हातावर लाल रंगाचे प्रतिक उठले म्हणून त्यादिवशी मुली व स्त्रीया हातावर मेहंदी काढतात 

आपल्या प्रत्येक सणांमध्ये केलेल्या पारंपारिक प्रथेमागे काहीतरी इतिहास हा आहेच उगाच थोतांड नाही ,

जसे नागपंचमीला दुध देणे-माफी मागणेउंच झोका घेणे-भावाची कीर्ती उंचावर जाण्यासाठी प्रार्थना करणे.हातावर मेहंदी काढणे-भावा-बहिणीने एकमेकांना न सोडण्याचे वचन देणेनवे वस्त्रे धारण करणे- एकदुसऱ्याला सुखी व आनंदी ठेवणे,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाग-साप यांचे संरक्षण करणे त्यांना अभय देण्याचे वचन घेणे .

तसा साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे, तो शेताच (क्षेत्र ) पालन करतो म्हणून त्याला क्षेत्रपाल ही नाव आहे .

आज भारतात ठिकठिकाणी सर्पमित्र नावाने संस्था आहेत त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.

भगिनींनो, तुम्ही योग्य त्या मंदिरात अथवा आपल्या घरीच पाटावर नागाची प्रतिमा काढून मनोभावे नागपंचमी साजरी करु  शकता, मात्र नागाकडुन भावाच्या रक्षणासाठी वचन घेता तसे आपल्या भावाकडूनही नाग रक्षणासाठी वचन घ्या, हिच खरी नागपंचमी.

अजय शिवकर 

केळवणे पनवेल 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने