कब्बडीची स्पर्धा पाहणे पडले महागात .. ३ जणांचा दूर्दैवी मृत्यू..
चोपडा,दि.३०( प्रतिनिधी):चोपडा तालुक्यातील वैजापूर येथून मध्य प्रदेशातील आंबा अवतार या गावी कबड्डीच्या स्पर्धा पाहण्यासाठी काही तरुण पिकप गाडीने रात्री निघाले होते. जामठी गावाजवळ त्यांचे वाहन पलटी होऊन त्यात दोन जण जागीच ठार आणि एकाची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली आहे तर सात ते आठ जण जबर जखमी झाल्याची घटना सोमवार दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री घडल्याचे दिसून आले आहे.
आणखी एकाला उपचारासाठी नेण्यात येत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली आहे. तर राहुल वेनसिंग बारेला ( वय १८) व विवेक सुनील बारेला (वय १८) हे दोघेही जबर जखमी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी उपचारार्थ दाखल झाले आहे.
यासह आणखी काही जखमींना गोदावरी फाउंडेशनच्या रुग्णालयात व खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलेले आहे. चोपडा पोलीस याबाबत माहिती घेत असून अपघाताबद्दल वैजापूरसह चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जखमींवर वैजापूरात उपचार
परशुराम नाश्या बारेला, दिलीप बारेला, राहुल सरदार बारेला यांना चोपडा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर किरकोळ जखमींवर वैजापूर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, चोपडा शहर पोलिसात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली असून शून्य क्रमांकाने गुन्हा मध्य प्रदेशात वर्ग होणार आहे.