जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी पंकज प्राथमिक विद्यालय व पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलची निवड ...पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कारांचे वितरण ...
चोपडा दि.१७( प्रतिनिधी) :--केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. सदर पुरस्कारासाठी चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज प्राथमिक विद्यालय शहरी भागातून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक व ग्रामीण भागातून पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल या दोन्ही शाळांची प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.एकाच संस्थेतील दोन्ही शाळांची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड झाल्यामुळे संस्थाध्यक्ष , संचालक मंडळ ,मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर पुरस्कारांचे वितरण नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .सदर पुरस्कार वितरण प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया , आ. संजय सावकारे , आ. शिरीष चौधरी, प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील , माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव , प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे , समन्वयक सरला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .सदर पुरस्कार प्रथम पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील व ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील यांनी स्विकारले.
सदर पुरस्कारासाठी शासकीय व अनुदानित शाळा पात्र आहेत.सदर पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ३८ शाळांची निवड करण्यात आली आहे . पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था अंतर्गत सर्वच शाळांमध्ये स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जाते. सोबत पाण्याची काळजी ,शौचालयांची व्यवस्था , हात धुण्यासाठीची व्यवस्था , देखभाल व्यवस्था , वर्तणूक बदल , क्षमता विकास अशा ५ क्षेत्रांमध्ये एकूण ३९ घटक निश्चित करण्यात आले आहेत.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले , उपाध्यक्ष अविनाश राणे ,संचालक पंकज बोरोले , सचिव अशोक कोल्हे ,संचालक भागवत भारंबे ,नारायण बोरोले ,गोकुळ भोळे यांनी पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील व पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे. सोबत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे...