सकारात्मक दृष्टीने जगा - आनंद आपोआप मिळेल... प्रा.डॉ. संजय कळमकर...चोपडा येथे पंकज बोरोले यांचा कार्यगौरव सन्मान सोहळा प्रसंगी प्रतिपादन...
चोपडा दि.३०( प्रतिनिधी) :---जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर सकारात्मक दृष्टीने जगा , आनंद आपोआप मिळेल. आनंदाची वाट स्वतः शोधायची असते. पाहण्याची दृष्टी बदला , साहित्य वाचा , कलेच्या आस्वाद घ्या तरच जीवनाचा खरा आनंद घेता येतो .काहींना आनंद घेता येत नाही म्हणून अस्वस्थ होतात. प्रज्ञा , प्रतिभा , कल्पकता ज्याच्या अंगी असते तो जीवनात निश्चितच यशस्वी होतो असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय कळमकर यांनी केले.
चोपडा येथे पंकज समूहाचे संचालक, विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांच्या वतीने आयोजित पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक व रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांचा कार्य गौरव सन्मान सोहळा प्रसंगी प्रा. डॉ. संजय कळमकर "आनंदाच्या वाटा " या विषयावर पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे व्याख्यानात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी आपल्या मनोगतात म्हणाले की ,समाजात व्यक्ती तीन प्रकारच्या असतात .काही जन्मजात मोठे असतात ,काही कर्तृत्वाने मोठे होतात तर काहींना मोठेपणा लादला जातो मात्र पंकज बोरोले हे स्वकर्तृत्वाने मोठे होत आहेत. दुसऱ्याचे दुःखाचे कारण होऊ नका पण आनंदात सहभागी व्हा. ज्याला पुढे जायचे आहे त्याने आपली कार्यक्षमता वाढवली पाहिजे असे मत त्यांनी मांडले...
डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, पंकज समूहातील प्रत्येक कर्मचारी एकेक रत्न असून कौतुकास पात्र आहेत .अकबराच्या दरबारात एकच बिरबल होता पण पंकज समूहात अनेक बिरबल असल्याचे ते म्हणाले .याप्रसंगी चोपडा विधानसभेच्या आमदार सौ लताताई सोनवणे, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ जयश्री महाजन, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आदींनी आपले मनोगत व्यक्त केली.
*पंकज बोरोले यांचे सत्काराला उत्तर*
विविध संस्थांनी मला पुरस्कार देऊन गौरविले त्यात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते बांबू सेवक सन्मान , 94.3 FM यांच्यातर्फे रियल इस्टेट एक्सलन्स अवार्ड ,प्रेरणा दर्पण फाऊंडेशन तर्फे दर्पण पुरस्कार २०२२ व रोटरी उत्सव २०२२ उत्कृष्ट व यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे संचालक, विभाग प्रमुख आणि कर्मचारी वृंद यांनी माझा कार्यगौरव सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या भावनांचा मनापासून आदर करतो . समाजसेवेचे बाळकडू मला लहानपणापासूनच घरातून मिळाले आहे. समाजातील मागास घटकांची सेवा करायची शिकवण आई - वडिलांकडून मिळाली असल्याचे ते म्हणाले. सामाजिक कार्य सतत करीत राहावे. समाज कार्याची दखल घेत असतो. त्याचे फलित म्हणजे आजचा कार्यगौरव सन्मान सोहळा...
सदर कार्यगौरव सन्मान सोहळा प्रसंगी रोटरी उत्सव २०२२ चे प्रकल्प प्रमुख ॲड रुपेश पाटील, मानद सचिव प्रविण मिस्त्री , सहप्रकल्प प्रमुख चेतन टाटिया, खजिनदार तेजस जैन आदींचा देखील सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, डॉ.उल्हास पाटील ( माजी खासदार रावेर ) , सौ लताताई सोनवणे (आमदार - चोपडा विधानसभा ) , सौ.जयश्री महाजन (महापौर महानगरपालिका जळगाव ) , डॉ.सुरेश बोरोले ( अध्यक्ष - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था ), पंकज बोरोले ( संचालक - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा अध्यक्ष - रोटरी क्लब ऑफ चोपडा ) , कैलास पाटील ( माजी आमदार चोपडा ), हेमलता बोरोले, दिपाली बोरोले , मंगला पाटील (महिला शिवसेना तालुका प्रमुख ) आदी उपस्थित होते...
कार्यक्रम प्रसंगी शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन योगेश चौधरी यांनी केले तर आभार डॉ. महादेव वाघमोडे यांनी मानले.