केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालना येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली भेट

 


 केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालना येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली भेट


चाळीसगाव दि.१२( ग्रामीण प्रतिनिधी सतिष पाटील):जालना - चाळीसगाव तालुक्यातील अपडाऊन करणाऱ्या प्रवाश्यांना जळगाव जाण्यासाठी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कोणतीही गाडी नसल्याने येणाऱ्या अडचणी व चाळीसगाव जंक्शन येथे जलद एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आणि विविध समस्यांबाबत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालना येथे भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी विविध बाबींकडे लक्ष वेधले. 

चाळीसगाव मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा व नाशिक, धुळे, औरंगाबाद या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा मोठा तालुका आहे. चाळीसगाव येथून जळगाव जिल्हा मुख्यालय हे जवळपास १०० किमी अंतरावर असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाश्यांना रेल्वे प्रवास अतिशय सोयीचे माध्यम आहे. मात्र कोविड काळानंतर चाळीसगाव येथील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बरेच बदलले असून त्याचा सर्वाधिक फटका हा नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी कारणांसाठी नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाश्यांना बसला आहे. याबाबत रेल्वे प्रवाशी संघटना यांनी माझ्याकडे त्यांना येणाऱ्या समस्या मांडल्या असून त्या सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे वैयक्तिक लक्ष द्याल अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी ना.दानवे यांच्याकडे व्यक्त केली. ना.रावसाहेब दानवे यांनीदेखील सर्व मागण्या समजून घेत संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात येऊन लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या चाळीसगाव रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांच्या निवेदनाच्या माध्यमातून मांडलेल्या समस्या पुढीलप्रमाणे.


१) महानगरी एक्सप्रेस (२२१७७) सकाळी ०५.४० वाजता, महाराष्ट्र एक्सप्रेस (११०३९) सकाळी ०६.०० वाजता, कुशीनगर एक्सप्रेस (२२५३८) सकाळी ०६.१० वाजता, ह्या तिन्ही रेल्वे गाडींची चाळीसगाव स्थानकावर आगमनाची वेळ हि साधारण सकाळी ०६.०० च्या दरम्यान आहे. त्यामुळे अपडाऊन करणाऱ्या वर्गाला पहाटे सकाळी ०४.०० वाजता उठून धावपळ करत रेल्वे गाडी पकडावी लागते. चाळीसगाव स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसची आगमन होण्याची पूर्वीची वेळ सकाळी ०७.०० वाजता होती. ती पूर्ववत केल्यास अप डाऊन करणाऱ्या नोकर वर्गाची सकाळची धावपळ कमी होईल. तसेच सकाळी ०६.०० ते १२.०० वाजेपर्यंत जळगाव जाण्यासाठी तब्बल ६ तास कोणतीही मेमू ट्रेन किंवा एक्सप्रेस १२.०० वाजेपर्यंत चाळीसगाव स्थानकातून नसल्यामुळे नोकर वर्गाला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाईलाजास्तव त्यांना एसटी किंवा प्रायव्हेट वाहनाने जळगाव पोहोचावे लागते. त्यामुळे त्यांना किमान ३००/४०० रुपये दोन्ही बाजूंनी प्रवासाचा खर्च येतो. दहा हजार रुपये कमावणाऱ्या नोकरदाराला रोजचा ३००/४०० रुपये आर्थिक भुर्दंड हा परवडणारा नाही. तरी नोकरदार वर्गाला सोईस्कर होतील अशा प्रकारे ट्रेनच्या वेळेचे नियोजन करावे. 


२) देवळाली भुसावळ पॅसेंजर (अप आणि डाऊन) ट्रेन सध्या मेमु ट्रेन म्हणून चालवण्यात येणार आहे, पण ती अद्याप सुरू झाली नाही ही ट्रेन पूर्ववत सुरू करून तिची पूर्वीच्या वेळ सकाळी ०७.०० वाजता चाळीसगाव स्थानकात होती ही अप डाउन रेल्वे प्रवाशांसाठी खूप सोयीची होती त्यामुळे ही ट्रेन कोरांना काळापूर्वी ज्या वेळेवर सुरू होती त्याच वेळेस पूर्ववत सुरु करावी हि विनंती.


३) मासिक पास बंद असल्यामुळे रोज सकाळी गाडी पकडण्यासाठी अपडाऊन प्रवाशांना तासभर आधी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना मासिक पासची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी. 

४) मुंबई भुसावळ पॅसेंजर (अप आणि डाऊन) ही ट्रेन सध्या मेमु ट्रेन म्हणून चालवण्यात येत आहे. ती इगतपुरी ते भुसावळ दरम्यान सुरू झाली आहे. पण ती मुंबई पर्यंत अद्याप सुरू झाली नाही, ही ट्रेन पूर्ववत सुरू करून मुंबई पर्यंत वाढवणे शक्य नसल्यास किमान या गाडीला कल्याण पर्यंत तरी न्यावे.


५) रोहिणी रेल्वे स्थानक हे भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक असून ते करंजगाव, पिंपळगाव, राजदेहरे, गंगाश्रम, घोडेगाव, शिंदी, सेटलमेंट तांडा, हातगाव, अंधेरी, इसापूर तांडा, तळेगाव, ब्राम्हणशेवगे, इत्यादी १० ते १२ महत्वाच्या गावांना जोडलेले आहे. ह्या सर्व खेड्यातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार वर्गाला मुंबई भुसावळ रेल्वे मार्गाशी जोडणारे सर्वात जवळचे एकमेव रेल्वे स्टेशन म्हणजे रोहिणी रेल्वे स्टेशन आहे. पण मागील काही दिवसांपासून येथे दोन्ही पॅसेंजर शटलचा थांबा सेन्ट्रल रेल्वेच्या भुसावळ विभागाने कुठलेही कारण न देता बंद केला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची शहराशी असलेली नाळ पूर्णपणे तुटली गेली, त्यामुळे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला हक्काचे रेल्वे स्थानक बंद पडले आहे.

तरी सध्या येथे थांबणाऱ्या शटल गाड्या ह्या भूसावळ देवळाली मेमो ट्रेन / भुसावळ इगतपुरी मेमो ट्रेन म्हणून चालवण्यात येत आहे. तरी ह्या दोन्ही ट्रेन ला रोहिणी रेल्वे स्थानकातील थांबा हा पूर्ववत सुरु करण्यात यावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने