भडगावात अवैध वाळू वाहतूकीने घेतला तब्बल ३ युवकांचा बळी.. ट्रॅक्टर खाली दबून यमदूतच्या दारात.. मध्यरात्री गरिब कुटुंबिय आक्रोशात बुडाले..
भडगाव दि.१९(प्रतिनिधी) जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा प्रचंड उन्माद वाढला सुसाट वेगाने धावणाऱ्या या वाहनांच्या लपाछपी खेळात भीषण अपघात घडण्याच्या घटनांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.त्याचाच प्रत्यय काल भडगाव येथे घडला आहे.अवैध वाहतूकीचे ट्रॅक्टर उलटून तब्बल तीन युवकांचा मृत्यू झाल्यानें बुधवारची रात्र प्रचंड आक्रोशाने दणाणून निघाली आहे.या भयावह प्रकारांकडे मात्र प्रशासन गांधार पट्टी बांधून बसले असल्याने जनतेत नाराजीचा सूर वाढला आहे.
गिरणापात्रातून भरलेली वाळू उपसा करण्यासाठी घेवून जात असतांना बुधवारी रात्री 11 वाजेच्या ट्रॅक्टर उलटल्याने तीन जणांचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.
बुधवार दि 18 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास वाळू घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरला भडगाव ते वडधे फाट्या दरम्यान अपघात झाला. ट्रॅक्टरट्राली उलटी झाल्याने यात तीन युवक ट्रॅक्टर खाली दाबले गेले. यात सुरेश अशोक शिंदे (वय 27) रा. टोणगाव, रवी सुरेश शिंदे (वय 25), मयूर भोई (वय 21) रा आझाद चौक भडगाव यांचा समावेश आहे.
त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले. या घटने बाबत पोलिसात उशिरा पर्यन्त नोंद नव्हती. यात तीन जण जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अवैध वाळू वाहतूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून हप्तेखोरीमुळे देखील रात्री वाळूची अवैध वाहतूक होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीने थैमान घातले असून रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावर वाळुची भरलेली डंपर बिनधास्तपणे ये जा करीत असतात. त्यातच अधिकाऱ्यांनी देखील आता तोडीपाणीची नवीन पध्दत अवलंबिली असून रात्रभर त्यांचे पंटर रस्त्यांवर घिरट्या घालत असतात.
या पंटरांना चुकविण्याच्या नादात देखील मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
