महिला सन्मानाची चळवळ सर्वप्रथम गौतम बुद्ध यांनीच केली सुरू : जयसिंग वाघ
धुळे दि.१८(प्रतिनिधी): भारतात इसवीसन पूर्व 1500 ते इसवी सन 900 या कालखंडात महिलांचे स्थान शुन्यवत होते ती फक्त विषयवासनेचे माहेरघर म्हणून ओळखली जात होती , तिची ओळख पुरुषांवरून ठरविण्यात येत असे , सार्वजनिक जीवनात तिला कोणताही मान सन्मान मिळत नव्हता अश्या समाजव्यस्थेत तिला पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावे , तिलाही भिख्खूसंघात प्रवेश देऊन निब्बान प्राप्त करता यावे म्हणून सर्वप्रथम सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनीच चळवळ उभारली असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले
धुळे येथील लुम्बिनी बुद्ध विहारात संथागार प्रतिष्ठान तर्फे 16 मे रोजी बुद्ध जयंती निमित्त आयोजित जाहीर व्याख्यानात मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते
जयसिंग वाघ यांनी इतिहासातील अनेक दाखले देत सांगितले की गौतम बुद्ध स्त्री पुरुष समतेचे पुरस्कर्ते होते , ते स्त्रीला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ समजत असत ,महिलेच्या पोटीच राजे , सम्राट , चक्रवर्ती , महापुरुष जन्माला येत असल्याने तीचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते , बुद्धाने अनेक महिलांना भिख्खू संघात सामील करून घेतले , त्यातील कित्तेक महिलांनी आपला इतिहास निर्माण केला , तीला सार्वजनिक जीवनात मान सन्मान मिळू लागला यातून महिलांच्या जीवनात बुद्धाने मोठी क्रांती घडऊन आणली
याप्रसंगी सुमती मधुकर चव्हाण स्मृती प्रित्यर्थ दत्तीबाई पवार व उषाबाई बोराळकर यांचा आदर्श माता म्हणून साडी , सन्मानपत्र , सन्मानचिन्ह , बुके देऊन जयसिंग वाघ , प्रा विलास चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
प्रा विलास चव्हाण यांनी पुरस्कार विषयी तसेच संथागार या संस्थे विषयी सविस्तर माहिती दिली , कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विजय पवार यांनी , परिचय प्रा राजेंद्र बोराळकर , स्वागत प्रा सिद्धार्थ सोनवणे , सूत्रसंचालन प्रा डॉ प्रीती वहाने यांनी केले
कार्यक्रमाच्या सुरवातीला जयसिंग वाघ , प्रा विलास चव्हाण , प्रा राजेंद्र बोराळकर यांच्या हस्ते बुद्ध , बाबासाहेब आंबेडकर , सुमती चव्हाण यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले , त्रिशरण , पंचशील घेण्यात आले , कार्यक्रमास स्त्री पुरुष पांढरे कपडे परिधान करून मोठ्या संख्येने हजर होते , कार्यक्रम समाप्ती नंतर खिरदान झाले
