यु ट्यूब पाहून बनावट नोटांचा छपाई करणाऱ्यास जामनेरात अटक
जामनेर दि. २०मे(प्रतिनिधी)तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथील एक तरुण दोनशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
पहूर पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी ही पहुर बस स्टँड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित इसम उमेश चुडामण राजपूत (वय 22) राहणार हिंगणे बुद्रुक तालुका जामनेर यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात खिशामध्ये दोनशे रुपये दराच्या तीन नोटा मिळून आल्या.
त्यापैकी एक नोट संशयास्पद वाटल्याने त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यास पोलीसाचा खाक्या दाखवून नंतर त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने स्वतःचे घरी हिंगणे बुद्रुक येथे युट्युब वर पाहून रंगीत प्रिंटर व मोबाईलच्या साह्याने दोनशे रुपये दराच्या नकली नोटा तयार करून मार्केटमध्ये दिल्याची माहिती दिली.
त्यावरून तात्काळ पोलीस पथक हिंगणे बुद्रुक या गावी जाऊन आरोपी त्याची घराची झडती घेतली असता त्याच्या घरात कॅनोन कंपनीचे प्रिंटर तसेच दोनशे रुपये दराच्या 46 बनावट नोटा व नोटा बनवण्यासाठी लागणारे कोरे कागद असे साहित्य मिळाले.
याबाबत उमेश चुडामन राजपूत (वय 22) राहणार हिंगणे बुद्रुक तालुका जामनेर याचे विरुद्ध पहूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 175 / 2022 भादवि कलम 489 अ, 489 ब, 489 सी ,489 डी, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आरोपीने आतापर्यंत किती बनावट नोटा तयार केल्या व कोणत्या कोणत्या मार्केटमध्ये वापरल्या व त्याने कोणास हाताशी धरून मदत घेतली याबाबतचा तपास पोलिस करीत आहे.
पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत कातकडे, पाचोरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर देशमुख, गोपाल माळी तपास करीत आहे.